बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास योग्य दिशेने सुरू असून महत्त्वाचे धागेदोरे तपासी यंत्रणेकडे असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नॅशनल सिक्युरिटी ग्रुप (एनएसजी) आणि नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सी (एनआयए) या यंत्रणांचा संघ त्वरित बोधगया येथे जाण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, खराब हवामानामुळे या चमूंना दिल्ली येथील विमानतळावरून पुढे जाता आले नाही. त्यामुळे तपासी यंत्रणा गया येथे काहीशा उशिराने पोहोचल्या, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे तळेगाव येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हा तपास प्रगतिपथावर असून महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. मात्र, त्याचा तपासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी कोणताही माहिती देणे संयुक्तिक होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक राज्यामध्ये ‘एनआयए’ टीम कार्यरत आहे. त्यामुळे या घटनेनंतर बिहार येथील टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहे. दिल्ली येथील तज्ज्ञ आणि उच्चाधिकारी हे देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. आता कोणत्याही प्रकारची ढिलाई असणार नाही. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यापूर्वी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बॉम्बस्फोटांचे सीसीटीव्ही चित्रण प्रसारित
बिहारमधील महाबोधी मंदिर व आजूबाजूच्या भागात रविवारी सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे सीसीटीव्ही फुटेज आज प्रसारित करण्यात आले, त्यात अनेक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. बॉम्बस्फोटांचे सीसीटीव्ही फुटेज हे मंदिराच्या आवारात रविवारी सकाळी ५.२५ वाजता जेव्हा तेथे स्फोट झाला होता तेव्हाचे आहे. त्यात वयाच्या पंचविशीतले एक मुलगा व मुलगी जीव वाचवण्यासाठी रस्त्याने झपाझप जाताना दिसत आहेत. या चित्रीकरणात आणखी एक व्यक्ती दिसत असून ती अंदाजे तीस वर्षे वयाची आहे. ही व्यक्ती महाबोधी मंदिरात चालताना दिसते आहे नंतर स्फोटाच्या ठिकाणी जाऊन परत ती बाहेर निघून जाते असे चित्रीकरणात दिसते. स्फोटामुळे झालेला धूर, त्या वेळी तिथे असलेल्या शेकडो माणसांचा जमाव यात दिसतो.त्यात महाबोधी मंदिरापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी मंदिरात झालेल्या स्फोटाचा आवाजही ध्वनिमुद्रित झाला आहे.
स्फोटांचा तपास एनआयएकडे देण्याची नितीशकुमारांची मागणी
केंद्रीय गुप्तचर खात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बोधगया येथे स्फोट झाले असा विरोधकांकडून केला जाणारा आरोप बिनबुडाचा असून केंद्र सरकारने या स्फोटांची तपासणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवावी अशी मागणी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.
केंद्राने बोधीगया या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी तसेच संरक्षणार्थ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल तैनात करावे अशी मागणीही आपण सरकारकडे करणार असल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यामुळे बिहारचे सरकार कमकुवत झाले आहे, हा विरोधकांचा आरोप खोटा आणि निराधार असल्याचे कुमार यांनी सांगितले. उलट भाजपाच सत्तेसाठी आतुर असल्याने ते तसा कांगावा करीत असल्याचा आरोप कुमार यांनी केला.
निदान स्फोटांसारख्या कठीण प्रसंगांचे तरी राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षा नितीशकुमार यांनी व्यक्त केली.
स्फोटात अमोनियम नायट्रेट व सल्फर
बिहारमधील स्फोटात अमोनियम नायट्रेट व सल्फर यांचा वापर केलेला होता व ते छोटय़ा सिलिंडर्समध्ये बसवण्यात आले होते असे प्राथमिक अहवालांमध्ये म्हटले आहे. हे कमी तीव्रतेचे बॉम्ब आयईडीसारखेच होते व ते अॅनलॉग क्लॉक टायमरने उडवण्यात आले. एनएसजीने स्फोटानंतर केलेल्या विश्लेषणानंतर असे दिसून आले की, अमोनियम नायट्रेट, सल्फर व पोटॅशियम यांचे इमल्शन तयार करून त्यात धातूचे अणुकुचीदार तुकडे टाकण्यात आले होते.