पीटीआय, कुवेत शहर
भारत आणि कुवेतने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करून ते सामरिक भागीदारीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांच्यादरम्यान रविवारी विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी आणि कुवेतचे अमिर यांनी माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये संबंधांना चालना देण्यावर भर दिला. अमिर शेख मेशल यांच्याबरोबरची बैठक अतिशय उत्तम झाली असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले. तर, ‘‘या दोन्ही नेत्यांनी भारत-कुवेत संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी विविध मार्ग शोधण्यावर भर दिला,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. यावेळी कुवेतमधील भारतीयांना चांगले आयुष्य मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमिर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादी कारवायांसह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला. तसेच दहशतवादविरोधी सहकार्य वाढविण्यावर भर दिला. पंतप्रधान मोदी यांचे कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी युवराज शेख सबाह अल-खालिद अल-सबाह यांचीही भेट घेतली.
पंतप्रधानांना सर्वोच्च पुरस्कार
भारत आणि कुवेतदरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. बायन पॅलेस येथे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जेबर अल-सबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला. हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारत-कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले.
द्विपक्षीय संबंध दृष्टिक्षेपात
● कुवेत भारताचा आघाडीचा व्यापारी भागीदार देश
● २०२३-२४मध्ये द्विपक्षीय व्यापार १०.४७ अब्ज डॉलर
● कुवेत भारताचा सहाव्या क्रमांकाचा कच्चे तेल पुरवठादार देश
● भारताची कुवेतला निर्यात २ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली
● भारतातील कुवेतची गुंतवणूक १० अब्ज डॉलर
दोन्ही देशांदरम्यान असलेले घनिष्ठ संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने आमची भागीदारी सामरिक पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात आमची मैत्री अधिक बहरेल याविषयी मी आशावादी आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान