करचुकवेगिरी तसेच कर टाळण्याच्या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी विविध देशांमार्फत मिळालेल्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करण्यात येईल, असा निर्वाळा सरकारने मंगळवारी संसदेत दिला. अर्थराज्यमंत्री निर्मला सीतारामन् यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
करचुकवेगिरीविरोधात मोहीम वेगाने सुरू असून जेथे कोठे करचुकवेगिरी मग ती देशात असो की सीमेपलीकडील व्यवहारांची असो, थेट करविषयक कायद्यातील तरतुदींद्वारे त्यांचा तपास करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे सीतारामन् यांनी सांगितले. देशाबाहेर दडविण्यात आलेला बेहिशेबी पैशांचा शोध घेण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. सन १९४८ ते २००८ या कालावधीत बेकायदा व्यवहारांद्वारे २१३.२ अब्ज अमेरिकी डॉलर्स देशाबाहेर पाठविण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
केंद्रीय स्तरावरील ७९ सार्वजनिक उद्योग तोटय़ात
नवी दिल्ली : केंद्रीय स्तरावरील ७९ उद्योग (सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस) तोटय़ात असून ४० हजार ९३७ कोटी रुपये गुंतवून त्यांच्यापैकी ४८ उद्योगांचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.तोटय़ातील या ७९ उद्योगांमधील भागभांडवल अधिक दीर्घ मुदतीचे कर्ज धरून एकूण गुंतवणूक १.५७ लाख कोटी रुपयांच्या घरात होती. या उद्योगांपैकी चार उद्योगांचा पुनर्विकास केला जाऊ शकत नसल्यामुळे ते मोडीत काढण्यात येतील, असे जेटली यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांशी संबंधित मंडळाने केलेल्या शिफारशींवरून ४८ उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या उद्योगांनी आता अधिक व्यावसायिकतेने काम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
अमरनाथ यात्रेकरूंच्या छावणीतील सिलिंडर स्फोटात ४ ठार, ३ जखमी
श्रीनगर : गंदेरबल जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेकरूंच्या निवासी छावणीत मंगळवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन यात्रेकरू जखमी झाले आहेत. हे यात्रेकरू पंजाबमधील भटिंडाचे रहिवासी होते.यात्रेकरूंच्या छावणीतील स्वयंपाकघरात मंगळवारी पहाटे सव्वा चार वाजता नाश्त्याची तयारी केली जात असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे या तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या स्वयंपाकघराला आग लागली आणि त्यात होरपळून या यात्रेकरूंचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. एलपीजी सिलिंडरच्या पाइपमधून वायुगळती होत असल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींना गंदेरबल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गोव्याच्या लोकप्रतिनिधींची परदेश वारीवर १३.२४ कोटी रुपयांची उधळपट्टी
पणजी : ‘पर्यटनास चालना’ देण्याच्या सबबीखाली गोव्याचे तीन मंत्री आणि सत्तारूढ आघाडीच्या चार आमदारांनी गेल्या दोन वर्षांत करदात्यांच्या १३.२४ कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. सर्वात जास्त उधळपट्टी राज्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली असून अन्य दोघा मंत्र्यांमध्ये ऊर्जामंत्री मिलिंद नाईक आणि उद्योगमंत्री महादेव नाईक यांचा समावेश आहे. यासंबंधी विचारण्यात आलेल्या उत्तराची माहिती मंगळवारी विधिमंडळामध्ये सादर करण्यात आली.
या मंत्र्यांखेरीज, नीलेश काब्राल, अनंत शेट, सुभाष फळदेसाई व गणेश गावकर या आमदारांनीही गेल्या दोन वर्षांत सरकारी खर्चाने परदेशी पर्यटनाची मौज लुटली असून त्यासाठी व्यापारजत्रा आणि रोडशोचे निमित्त दाखविण्यात आले आहे. ‘लिस्बन ट्रॅव्हल मार्ट’, ‘पोर्तुगाल आयटीबी बर्लिन’, न्यूयॉर्कमधील ‘रोडशो’, लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ आदी कार्यक्रमांनाही या मंत्र्यांनी हजेरी लावून ‘पर्यटनाची माहिती’ घेतली असल्याचे सांगण्यात आले.