हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे, ती प्रत्येकाने शिकली पाहिजे. असे आवाहन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये, शहरांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. त्यामुळे ही भाषा आलीच पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपली मातृभाषाही अस्खलितपणे बोलता आली पाहिजे अशी आग्रही भूमिकाही नायडू यांनी घेतली आहे. अहमदाबादमध्ये महात्मा गांधी यांचा साबरमती आश्रम आहे, त्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नायडू बोलत होते.
हिंदी शिकण्यासोबतच मराठी, भोजपुरी, गुजराती, तामिळ, बंगाली या भाषाही महत्त्वाच्या आहेत. या भाषांना प्रादेशिक भाषा म्हणता येणार नाही, कारण या भाषांसोबत भावही व्यक्त होतो. आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे माध्यम असते ती म्हणजे आपली भाषा. त्यामुळे मातृभाषेत शिक्षण घेणे गरजेचे आहे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषा बोलली जाण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण इंग्रजीला जास्त महत्त्व देतो ही बाब काहीशी दुर्दैवी आहे, कारण त्यामुळे आपण आपली मातृभाषा विसरत चाललो आहे.
इंग्लिश मीडियम संस्कृती जपता जपता आपल्या मनात विचारही तसेच येत आहेत, हे देशहितासाठी चांगले नाही. इंग्रजी या भाषेला माझा अजिबात विरोध नाही. मात्र या भाषेचा जितका प्रभाव आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला आपल्या मातृभाषेचा, राष्ट्रभाषेचा अभिमान असायला हवा. सध्याच्या घडीला साक्षर आणि निरक्षर माणसांची मुलेही त्यांना मम्मी आणि पप्पा म्हणून हाक मारतात. पण किती मुले अशी आहेत जी त्यांच्या आई वडिलांना मातृभाषेत हाक मारतात? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. देशात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी या इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात. यामध्येही बदल घडवणे गरजेचे आहे, असेही नायडू यांनी म्हटले आहे.