एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवर २७ टक्के कर लादल्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण असताना देशातील उद्याोगांसाठी एक छोटा आशेचा किरणही आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया यांच्यावर अधिक कर लादला असल्यामुळे अमेरिकेतील आयातदार भारताकडे वळू शकतात. दुसरीकडे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेत महागाई वाढल्यास डॉलर स्वस्त होऊन त्याचा फायदा रुपयाच्या विनिमयदराला होऊ शकतो.
ट्रम्प यांनी ६० देशांवर वाढीव कर लादले असले, तरी त्यामध्ये बरीच तफावत असून प्रतिस्पर्धी देशांवर हा करबोजा अधिक आहे की कमी यावरही प्रत्येक देशाच्या व्यापाराचे चित्र अवलंबून असेल, असे मानले जात आहे. अमेरिकी अध्यक्षांनी केलेल्या घोषणेनुसार सर्व देशांवर १० टक्के सरसकट आयातशुल्क उद्या, ५ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यानंतर ९ एप्रिलपासून जाहीर झाल्यानुसार एकूण करआकारणी केली जाईल. भारतीय मालावर २७ टक्के कर लादला जाणार असला, तरी निर्यातीमध्ये प्रमुख स्पर्धक असलेल्या चीनवर सर्वाधिक ५४ टक्के कर अमेरिकेने लावला आहे. व्हिएतनामवर ४६ टक्के, बांगलादेश ३७ टक्के, थायलंडवर ३६ टक्के आयातशुल्क लादले जाणार आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय निर्यातदारांना होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने त्या दिशेने चाचपणी सुरू केली आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी मध्यरात्रीनंतर ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर ‘जशास तसा’ व्यापारकरांची घोषणा केल्यानंतर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याची चर्चा सुरू झाली आहे.
विविध उद्याोगांना फटका
अमेरिकेच्या निर्णयाचा मोठा फटका भारताच्या दागिने निर्मिती क्षेत्राला बसणार आहे. सुट्या हिऱ्यांवर शून्यावरून २० टक्के आयातशुल्क होणार असून, सोन्याच्या दागिन्यांवर ५ ते ७ टक्के करआकारणी होईल, असे कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कोलिन शाह यांनी सांगितले.
ज्वेलरी क्षेत्रात अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. भारतातून अमेरिकेला ११ अब्ज डॉलरची ज्वेलरी निर्यात होते.
भारतातून अमेरिकेला निर्यात
औषधनिर्माण आणि जीवशास्त्रीय क्षेत्र (८.१ अब्ज डॉलर), टेलिकॉम साहित्य (६.५ अब्ज), प्रेशस आणि सेमीप्रेशस स्टोन (५.३ अब्ज डॉलर), पेट्रोलियम उत्पादने (४.१ अब्ज डॉलर), सोने आणि इतर प्रेशस धातूंचे दागिने (३.२ अब्ज डॉलर), तयार कपडे (२.८ अब्ज डॉलर), लोखंड आणि पोलाद उद्याोग (२.७ अब्ज डॉलर)
अमेरिकेतून भारतात आयात
कच्चे तेल (४.५ अब्ज डॉलर), पेट्रोलियम उत्पादने (३.६ अब्ज डॉलर), कोळसा (३.४ अब्ज), कट आणि पॉलिश केलेले हिरे (२.६ अब्ज डॉलर), विद्याुत साहित्य (१.४ अब्ज डॉलर), विमाने, अवकाशयाने आणि त्यांचे सुटे भाग (१.३ अब्ज डॉलर), सोने (१.३ अब्ज डॉलर)
जीडीपीमध्ये अर्धा टक्का घट शक्य
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाला (जीडीपी) बसण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात ६.५ टक्क्यांऐवजी जीडीपी ६ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास किंवा भारताने अमेरिकेवर प्रतिशुल्क लादल्यास त्याचा बरा-वाईट परिणाम होण्याचीही शक्यता आहे. ‘ईवाय’ या सल्लागार संस्थेचे मुख्य धोरण सल्लागार डी. के. श्रीवास्तव यांनी जीडीपी अर्ध्या टक्क्याने (५० बेसिक पॉइंट) घटण्याची शक्यता वर्तविली. त्याच वेळी अमेरिकेमध्ये महागाई वाढून डॉलरची किंमत घसरू शकेल आणि परिणामी रुपयाच्या तुलनेत डॉलर स्वस्त होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला. सध्या करवाढीवर नव्हे, तर व्यापारी समतोलावर लक्ष द्यायला हवे, असे श्रीवास्तव म्हणाले. तर अमेरिकेच्या व्यापारकरामुळे जीडीपीमध्ये ०.३५ ते ०.४० टक्क्यांपर्यंतच राहील, असे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या देशातील प्रमुख अनुभूती सहाय यांनी म्हटले आहे. अर्थात, भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार झाल्यास करबोजा कमी होऊन दिलासा मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी करार झाला नाही आणि भारतानेही अमेरिकेबरोबर व्यापारयुद्ध छेडले, तर मात्र अर्थव्यवस्थेवर ताण आणखी वाढू शकेल, असे मानले जात आहे.
अमेरिका मोटारसायकलींवर केवळ २.४ टक्के कर आकारते. पण, थायलंड आणि इतर देश जास्त कर लावतात. थायलंड ६० टक्के, भारत ७० टक्के आणि व्हिएतनाम ७५ टक्के कर लावतात. इतर कर याहून अधिक आहेत. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका