देशातील दोन-तृतीयांश लोकसंख्येला एक ते तीन रुपये प्रतिकिलो अशा उच्च सवलतीच्या दराने दरमहा दरडोई पाच किलो अन्नधान्य पुरविणारे सुधारित अन्न सुरक्षा विधेयक सरकारने मंगळवारी मंजूर केले.
तथापि, जवळपास २.४३ कोटी गरीबातील गरीब कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजनेखाली आणण्यात आले असून अशा कुटुंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य मिळणार आहे.
सुधारित अन्न सुरक्षा विधेयकाला मंजुरी मिळाली असून येत्या शुक्रवारपूर्वी अन्न विधेयकात सुधारणा सुचविण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी वार्ताहरांना सांगितले.
सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे तर त्यासाठी ६१.२३ दशलक्ष टन अन्नधान्याची गरज आहे, असेही थॉमस म्हणाले.
तांदूळ, गहू आणि भरड धान्यासाठी अनुक्रमे तीन, दोन आणि एक रुपया प्रतिकिलो असे समान दर असून ते सर्व पात्र लाभार्थीना लागू आहेत. सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर तीन वर्षांनी दरांचा फेरविचार केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader