रेल्वे स्थानकांवर तसेच गाडय़ांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत तक्रारी होत असल्यामुळे रेल्वेने सेवांमध्ये सुधारणा करण्याकरता थेट गाडीतील प्रवाशांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून त्यांचा अभिप्राय घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
रेल्वे स्थानकांची स्वच्छता, फलाट, गाडय़ा, खाद्यपदार्थाचा दर्जा, वातानुकूलन यंत्राची क्षमता, गाडय़ांचा वक्तशीरपणा आणि बेडरोल्सचा दर्जा याबाबत प्रवाशांचे मत मागवण्यात येत आहे.
सध्या प्रत्येक गाडीमागे ६० ते ७० कॉल्स करण्यात येत असून, मेल व एक्सप्रेस गाडय़ांच्या सुमारे १ लाख प्रवाशांना यशस्वी कॉल्स करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या अभिप्रायांमुळे प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच सेवा पुरवठादारांची जबाबदारी निश्चित करणे यासाठी मदत होणार असल्याचे रेल्वेने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले.
हे काम भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळावर (आयआरसीटीसी) सोपवण्यात आले असून, प्रवाशांचा अभिप्राय ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम’ (आयव्हीआरएस)च्या साहाय्याने नोंदवला जाणार आहे. प्रवाशांना ‘चांगला’, ‘समाधानकारक’ आणि ‘असमाधानकारक किंवा वाईट’ अशा श्रेणीमध्ये त्यांचे मत नोंदवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा