अहमदाबाद : देशातील ६० कोटी गरीब लोकांचे जीवनमान सुधारणे हे नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. अहमदाबाद जिल्ह्यातील साणंद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला संबोधित करताना शहा यांनी मोदी सरकारचे गुणगान गायले.
शहा म्हणाले, की ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करून भारताला सुरक्षित केले, अनुच्छेद ३७० रद्द करण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले, अयोध्येत श्रीराम मंदिराचे बांधकाम हाती घेतले, चंद्रयान मोहिमेच्या माध्यमातून भारताला चंद्रावर नेले, स्वातंत्र्यानंतर भारताने सर्वोत्तम आर्थिक परिमाणे गाठली आणि स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च औद्योगिक विकासाचे नेतृत्व केले.’’ ते पुढे म्हणाले की अनेकदा पत्रकार नरेंद्र मोदींच्या यशाबद्दल विचारणा करतात. ‘‘कोणत्याही वाद, संभ्रम किंवा दुमताविना मी असे सांगेन, की ६० कोटी भारतीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदी यांनी केलेल्या कामाला मी सर्वाधिक गुण देईन’’. या वेळी अमित शहा यांनी उपस्थितांना देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेण्याची विनंती केली.