गेले काही दिवस पाकिस्तान राजकीय घडामोडींमुळे ढवळून निघाला आहे. पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षाने अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागलं आहे. इम्रान खान यांना १० एप्रिल रोजी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. इम्रान खान ज्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीइतकी चांगली राहिली नाही. त्यांनी पायउतार होताच शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

दरम्यान एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना, इम्रान खान मात्र भारतावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वी इम्रान खान यांचं भारतप्रेम उफाळून आलं होतं. ९ एप्रिल रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात इम्रान खानने भारताचं कौतुक केलं होतं. संबंधित भाषणात त्यांनी म्हटलं की, “मला आज दु:ख देखील होतंय आणि वाईट देखील वाटतंय. आपल्यासोबतच भारत स्वतंत्र झाला. मी इतरांपेक्षा भारताला चांगलं ओळखतो. माझे अनेक मित्र देखील आहेत. क्रिकेटमुळे मला लोकांकडून फार प्रेम मिळालं. मला वाईट वाटतय की आरएसएसच्या विचारसरणीमुळे आपले चांगले संबंध नाही. पण मला एक सांगावंसं वाटतं की ते फार स्वाभिमानी लोक आहेत.”

यानंतर आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पुन्हा एकदा इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत कौतुक करताना इम्रान खान म्हणाले की, ‘भारत हा असा देश आहे, जो इतर देशाच्या आधी आपल्या देशातील नागरिकांचा विचार करतो. भारत सध्या अमेरिकेकडून सामरिक सहकार्य घेत आहे. तर रशियाकडून तेल आयात करत आहेत. पण भारताने रशियाकडून तेल आयात करू नये, असा दबाव टाकला असता, आमच्या देशासाठी काय चांगलं आहे, याच्या आधारावर आम्ही निर्णय घेतल्याचं भारतानं ठणकावून सांगितलं आहे.

भारताचं परराष्ट्र धोरण हे भारतातील लोकांसाठी आहे. इतर देशांना फायदा मिळवून देण्यासाठी नाही, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला तोंड फुटलं असताना, आपण आपल्या देशाच्या हितासाठी रशियात गेलो होतो, असं म्हणत त्यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. पाकिस्तानमधील लाहोर याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून हे भाषण केलं आहे. या भाषणाला हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.