पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून टाकण्यासाठी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान व कॅनडाचे धर्मगुरू ताहीर उल काद्री यांनी दबाव कायम ठेवला आहे. नवाझ शरीफ यांनी ३० दिवसांसाठी पदत्याग करावा व त्याकाळात निवडणुकांत गैरप्रकार झाले की नाही याची न्यायिक आयोगाकडून चौकशी करावी या मागणीचा इमरान खान यांनी पुनरुच्चार केला.  
   गेल्या  निवडणुकीत गैरप्रकार करण्यात आले असून शरीफ सत्तेवर आले असा आरोप इमरान यांनी केला आहे. पाकिस्तान सरकारने मात्र हा प्रस्ताव फेटाळला आहे.  
    पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे नेते इमरान खान यांनी त्यांच्या समर्थकांसमोर बोलताना सांगितले की, संसदेला आमचा घेराव कायम राहील. सरकारने मात्र निदर्शकांची मागणी फेटाळल्याने राजकीय कोंडी कायम असून रविवारी अकराव्या दिवशीही संघर्षांची स्थिती कायम राहिली आहे.
चर्चा निष्फळ
सरकारी मध्यस्थ व तेहरिक ए इन्साफ यांच्यात शनिवारी रात्री झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. इमरान खान यांच्या पक्षाने असा प्रस्ताव मांडला होता की, मे २०१३ मधील निवडणुका कुठल्याही गैरप्रकाराविना झाल्या की नाही याचा फैसला निष्पक्ष न्यायिक आयोगामार्फत तीस दिवसात केला जावा व त्याकाळात शरीफ यांनी राजीनामा द्यावा. सरकारने ही मागणी फेटाळली मात्र इतर मागण्या मान्य केल्या.
 आंदोलनाचा निर्धार कायम
आपला पक्ष धरणे आंदोलन कायम ठेवील व इतर शहरातही आंदोलन केले जाईल असे इमरान यांच्या पक्षाने म्हटले आहे. बैठकीनंतर मुख्य वाटाघाटीकार शहा मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, शरीफ जर निर्दोष ठरले तर त्यांना परत सत्ता दिली जाईल.
सरकारी प्रतिनिधी अहसान इक्बाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आम्हाला मान्य नाही. इमरान खान व धर्मगुरू काद्री यांचे समर्थक संसद इमारतीबाहेर निदर्शने करीत आहेत.
पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे की, नॅशनल असेंब्ली असलेल्या रेड झोनमध्ये मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. खान व काद्री यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी काही रस्ते रोखण्यात आले. इमरान खान यांनी सांगितले की, शरीफ यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राजधानी सोडणार नाही. निवडणुका योग्य होत्या, असे ३० दिवसात सिद्ध झाले तर शरीफ पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात. तुम्ही दोषी सिद्ध व्हाल म्हणून आम्ही मागणी करीत नाही.

Story img Loader