पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळून आलाय. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशामध्ये निवडणुका घेण्याची मागणी करत आपल्या समर्थकांसहीत इस्लामाबादमध्ये प्रवेश केलाय. इम्रान खान यांनी या आंदोलनाला आझादी मोर्चा असं नाव दिलं आहे. हे आंदोलन रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबादला रेड झोन घोषित केलं आहे. तर गृहमंत्रालयाने इस्लामाबादमधील सुरक्षा वाढवताना सैन्य तैनात करण्याचे आदेश दिलेत.
हजारोंच्या संख्येने इम्रान यांच्या‘पाकिस्तान तहरिकी इन्साफ’(पीटीआय) पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत. पीटीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इस्लामाबादमध्ये मध्यरात्रीपासून येण्यास सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. पीटीआयचे कार्यकर्ते शहरामध्ये प्रवेश करताना सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये हिंसक झटापट झाली. या हिंसेमध्ये इस्लामाबाद मेट्रो स्थानकालाही इम्रान खान यांच्या समर्थकांनी आग लावल्याचं पहायला मिळालं.
इम्रान खान यांच्या आझाद मोर्चादरम्यान नेमकं काय काय घडलंय पाहूयात १० महत्वाचे मुद्दे…
१) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या समर्थकांसोबत डी चौकच्या दिशेने मोर्चा घेऊन चालले आहेत. सध्या सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार इम्रान खान यांचे समर्थक सरकारी इमरतींवर हल्ला करणार नाही याची काळजी घेण्याची आणि त्या इमारतींना सुरक्षा पुरवण्याची प्राथमिकतेने काळजी घेतली जाणार आहे.
२) पीटीआयच्या समर्थकांना रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) च्या समर्थकांनी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील अनेक रस्ते अडथळे निर्माण करुन वाहतुकीसाठी बंद केलेत.
३) इम्रान यांच्या पीटीआय या पक्षाने शाहबाज शरीफ यांच्या १३ पक्षांची युती असणाऱ्या सरकारला तातडीने बरखास्त करण्याची मागणी केलीय. काळजीवाहू सरकार निर्माण करावं आणि लवकरात लवकर निवडणूक घ्यावी अशीही पीटीआयची मागणी आहे. सध्याच्या संसदेचा कार्यकाळ हा पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत आहे.
४) हिंसक आंदोलनादरम्यान पाकिस्तानमधील पीटीआय पक्षाच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केलीय. हजारोच्या संख्येने आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी इम्रान यांचे समर्थक रस्त्यांवर उतरलेत. मात्र सत्तेत असणाऱ्या सरकारला हे पटलेलं नसून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामधूनच संघर्ष निर्माण झालाय.
५) इम्रान खान यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीसांचा फौजफाटा कार्यरत आहे. आश्रूधुराच्या नळकांड्या फोडून समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही ठिकाणी लाठीचार्जही करण्यात आलाय. यामुळे संतापलेल्या पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर अनेक ठिकाणी दगडफेक केल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलीय. इस्लाबाद शहराला जणू युद्धभूमीचं स्वरुप आलं आहे.
६) २४ मे रोजी इम्रान खान यांच्या पक्षाचे १०० हून अधिक कार्यकर्त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली. पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी तातडीने देशामध्ये निवडणुका घेण्याची मागणी करत राजधानी इस्लामाबादकडे वाटचाल सुरु केली आहे. इस्लामाबादमध्ये नियोजित ठिकाणी आंदोलन करण्याचा पीटीआयच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी अचानक धरपकड सुरु केली.
७) इम्रान यांच्या आजादी मोर्चादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी निशाणा साधलाय. इम्रान यांच्या इशाऱ्यावरुन पीटीआयचे कार्यकर्ते हिंसा घडवून आणत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याचं उल्लंघन केलं जात आहे असंही मरियम म्हणाल्यात.
८) सरकारने अनेक ठिकाणी जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू केला आहे. लोक एका ठिकाणी मोठ्या संख्येने जमणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भातील निर्देश पोलिसांना देण्यात आलेत. लाहोर, रावळपिंडी आणि इस्लमाबादमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अनेक मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आलीय. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधील शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्यात.
९) पंजाबचे गृह सचिव सय्यद अळी मुर्तजा यांनी पत्रकरांना दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील या सर्वात मोठ्या प्रांतात शांतता राखण्यासाठी पोलिसाबरोबरच अर्थसैनिक दलाची मदत घेतली जात आहे. पंजामधील अन्य जिल्ह्यांमधून इस्लामाबादमध्ये चार हजार अतिरिक्त पोलीस कर्मचारी बोलवण्यात आले असून त्यांना शहरातील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलंय.
१०) मंगळवारी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी अमेरिकेने आपलं सरकार पाडल्याचा आरोप केला. शहबाज शरीफ सरकारवर निशाणा साधताना त्यांनी, या चोरांनी देशावर ताबा मिळवला आहे, असं वक्तव्य केलंय. मला अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि लष्कर सत्यासोबत उभं आहे, असंही इम्रान म्हणालेत.