पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांत्या नेतृत्वाखालील मोर्चातील शरीफविरोधी समर्थकांनी सरकारने निषिद्ध ठरवलेल्या (रेड झोन) क्षेत्रात रविवारी प्रवेश केला. प्रतिकूल हवामान आणि मोर्चात अधिक लोकांनी सहभाग घेतला नसतानाही शरीफविरोधी निदर्शकांनी दाद न देता चौथ्या दिवशीही इस्लामाबादेतकडे कूच कायम ठेवली होती.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीच्या सामन्यात ‘फिक्सिंग’ करून ती जिंकणाऱ्या शरीफ यांचे दिवस आता भरत आले आहेत. माझ्या हजारो समर्थकांच्या सोबतीने आपण त्यांच्याविरोधातील अंतिम सामना खेळण्यास तयार आहोत, असे आव्हान माजी कसोटीपटू इम्रान खान यांनी दिले आहे. याच वेळी कॅनडास्थित धर्मगुरू ताहिरुल काद्री यांनी शरीफ यांना सत्तेवरून पायउतार होण्यासाठी ४८ तासांचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
१९९२ साली इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकला होता. खान यांनी शरीफ यांना इशारा देताना म्हटले की, शरीफ पायउतार होण्यास नकार देणार असतील तर माझे समर्थक सरकारने निषिद्ध (रेड झोन) म्हणून घोषित केलेल्या परिसरात घुसतील. मग मात्र शरीफ यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
‘पाकिस्तान तेहरीके इन्साफ’चे अध्यक्ष असलेल्या खान यांनी पाकिस्तानच्या इतिहासातील हा दिवस महत्त्वाचा असून आज शरीफ यांच्याशी शेवटचा सामना आम्हाला खेळायचा आहे, अशी गर्जना केली. २०१३ मध्ये झालेल्या सामन्यात फिक्सिंग झाले होते, हे साऱ्या जगाला माहिती आहे. शरीफ यांनी निवडणूक अधिकारी आणि काळजीवाहूंना सोबत घेऊन ही निवडणूक आपल्या खिशात घातली. पण आता पाकिस्तानी जनता हे स्वीकारणार नाही, अशी ट्विप्पणी त्यांनी केली आहे. २०१३च्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांनी संसदेच्या ३४२ जागांपैकी १९० जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला होता.