इस्लामाबाद : पाकिस्तानात फेब्रुवारीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनादेश चोरणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई सुरू करण्याची मागणी, सध्या कारावासात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. शनिवारी अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना इम्रान यांनी ही प्रतिक्रिया दिली. इम्रान यांच्याशिवाय त्याची पत्नी बुशरा बीबी, सहकारी फराह गोगी आणि ज्येष्ठ उद्योगपती मलिक रियाझ हेही या प्रकरणी आरोपी आहेत.
हेही वाचा >>> छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अडचणीत; ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा इम्रान खान यांचा आरोप आहे. या निवडणुकीत इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चा (पीटीआय) पािठबा लाभलेल्या ९० हून अधिक अपक्ष उमेदवारांनी ‘नॅशनल असेंब्ली’मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, परंतु माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि माजी पंतप्रधान डॉ. परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) निवडणुकीनंतर तडजोड केली आणि देशात आघाडी सरकार स्थापन केले. जनादेश चोरून नवीन सरकार स्थापन केल्याचा ‘पीटीआय’चा आरोप आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इम्रान यांनी शनिवारी दावा केला की एकटया त्यांच्या पक्षाला तीन कोटींहून अधिक मते मिळाली आहेत, तर उर्वरित १७ राजकीय पक्षांना संयुक्तरित्या तेवढी मते मिळाली आहेत. इम्रान यांनी सांगितले, की आपल्या पक्षाने निवडणुकीतील अनियमितता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मांडल्या आणि बिगरसरकारी संस्थांनीही निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. या राजकीय कटाचा भाग म्हणून प्रथम ‘पीटीआय’ला त्याचे निवडणूक चिन्ह ‘क्रिकेट बॅट’पासून वंचित ठेवण्यात आले आणि नंतर आरक्षित जागांवर पक्षाला त्याचा वाटा देण्यात आला नाही.