आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तान सरकारने सोमवारी त्यांच्या ताफ्यातील ३४ आलिशान गाडयांचा लिलाव केला. यात काही बुलेट प्रूफ गाडयांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी खर्च कपातीच्या विविध योजनांची घोषणा करणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. आलिशान गाडयांशिवाय पंतप्रधान निवासस्थानात पाळण्यात आलेल्या आठ म्हशींची सुद्धा विक्री करण्याची योजना आहे मागच्या आठवडयात सरकारमधील सूत्रांनी ही माहिती दिली.

सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान निवासस्थानी या म्हशी पाळल्या होत्या. वापरात नसलेल्या चार अतिरिक्त हेलिकॉप्टरचा सुद्धा लिलाव करण्यात येणार आहे. राजकीय विषयांवरील पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक नईम उल हक यांनी ही माहिती दिली. सध्या ३४ गाडयांचा लिलाव करण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात ४१ गाडयांचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती जिओ न्यूजने दिली आहे.

ज्या कारचा लिलाव करण्यात आला त्यामध्ये मर्सिडीज बेंझच्या गाडया, बुलेट प्रूफ बीएमडब्ल्यू, तीन ५००० सीसी एसयूव्ही, दोन ३००० सीसी एसयूव्हीचा समावेश आहे. पुढच्या टप्प्यात ४० टोयोटा कार, लेक्सस एसयूव्ही आणि दोन लँड क्रूझरचा लिलाव होईल. जे सर्वात जास्त बोली लावतील त्यांनाच या कार विकण्यात येणार आहेत.

इम्रान यांनी त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खर्च कपातीच्या विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यात निधी उभारण्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर करण्यावर भर होता. सध्या पाकिस्तान कर्जाच्या बोझ्याखाली दबला आहे. आपण पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढून प्रगतीच्या वाटेवर आणू असा इम्रान खान यांनी दावा केला आहे.