पाकिस्तानातील गंभीर होत चाललेल्या राजकीय संकटाला शुक्रवारी वेगळीच कलाटणी मिळाली. नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी पार्लमेंट परिसरात धरणे धरून बसलेले विरोधी नेते इम्रानखान यांच्या ‘पाकिस्तान तहरिकी इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाच्या सर्व ३४ सदस्यांनी शुक्रवारी आपल्या ‘नॅशनल असेम्ब्ली’ सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी पाकिस्तानातील धार्मिक नेते ताहिरुल कादरी यांचा ‘पाकिस्तान अवामी तहरिक’ पक्ष आणि इम्रानखान यांचा पक्ष पार्लमेंट परिसरात धरणे धरून बसले आहेत. कालपासून या दोन्ही पक्षांनी नवाझ शरीफ सरकारशी चर्चासुद्धा बंद केली होती. त्यामुळे काल हा पेचप्रसंग गंभीर झाला होता. मात्र इम्रानखान यांच्या पक्षाच्या सर्व नॅशनल असेम्ब्ली सदस्यांनी आज सामूहिक राजीनामा दिला. मात्र इम्रानखान यांच्या पक्ष सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला असला तरी नवाझ शरीफ यांच्या सरकारच्या स्थैर्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही.
पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीत एकूण ३४२ सदस्य असून नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगचे निम्म्याहून अधिक म्हणजे १९० सदस्य आहेत. इम्रानखान यांचा पक्ष नॅशनल असेम्ब्लीत तिसरा मोठा पक्ष आहे.
आज शरीफ- झरदारी भेट
विरोधी पक्षांनी पार्लमेंटला घातलेल्या घेरावामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नवाझ शरीफ शनिवारी माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेणार आहेत. शरीफ यांनी आज झरदारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी झरदारी यांना उद्या दुपारी आपल्या घरी भोजनास येण्याचे निमंत्रण दिले. झरदारी यांच्या पत्नी व माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि शरीफ यांच्यात २००६ मध्ये ‘लोकशाहीची सनद’ या नावाने एक सामंजस्य करार झाला होता, हे या दोघांच्या शनिवारीच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर उल्लेखनीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा