क्रिकेटपटू इमरान खान याला पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत ओव्हरपीच चेंडूचा सामना जास्त करावा लागला. त्याला अपेक्षेपेक्षा फार कमी जागा मिळवता आल्या आहेत. खैबर-पख्तुनवाला प्रांतात मात्र त्याच्या यॉर्कर गोलंदाजीला यश आले असून तेथे मात्र त्याचा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ हा पक्ष एकमेव मोठा पक्ष ठरला आहे. साठ वर्षांच्या इमरान खानने ही निवडणूक जिंकण्यासाठी जिवाचे रान केले आहे. पाकिस्तानातील ऐतिहासिक निवडणुकीत त्याच्या पक्षाला दुसरे स्थान मिळणे शक्य आहे.
नॅशनल असेम्ब्लीच्या तीन जागा त्याला मिळाल्या, पण लाहोरमधील पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. इमरानने पंजाब प्रांतात मियॉवली येथे १०१००० मते मिळवून विजय संपादन केला त्याचे प्रतिस्पर्धी उबैदुल्ला शादी खेल यांना ५३ हजार मते मिळाली. इमरान खानने पेशावर येथे ६६४६५ मते मिळवली व अवामी नॅशनल पार्टीचे गुलाम अहमद बिलोर यांचा पराभव केला त्यांना ४४२१० मते मिळाली आहेत. बिलोर यांनी पराभव मान्य केला असून राजकारणात जय-पराजय असतोच. इमरान खान याने रावळपिंडीत पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे उमेदवार हनीफ अबासी यांचा पराभव केला.
लाहोर मतदारसंघात इमरान खानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे उमेदवार सरदार अय्याध सादिक यांनी त्याचा पराभव केला. एकूण २७२ जागांपैकी २६४ जागांचे कल हाती आले असून त्यात इमरानच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाला ३४ जागांवरच आघाडी मिळाली आहे.
निकालाचे स्वागत
प्रभावी विरोधी पक्ष हा लोकशाही यंत्रणेचा पाया असतो. गेली १० वर्षे पाकिस्तानात अशा विरोधी पक्षाचाच अभाव होता, मात्र आता ही उणीव आपला पक्ष भरून काढेल, असा विश्वास व्यक्त करीत इम्रान खान याने निकालाचे स्वागत केले आह़े

Story img Loader