पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना खुर्चीवरून खेचण्याचा चंग बांधलेल्या सरकारविरोधी निदर्शकांनी शुक्रवारी येथे भव्य मोर्चा काढला होता. माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मात्र, या मोर्चादरम्यान त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान थोडक्यात बचावले. या घटनेनंतर मात्र गुजरानवाला शहरात मोठय़ा चकमकी उडाल्या.
इम्रान खान आणि कॅनडास्थित धर्मगुरू ताहीरूल कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांनी, शरीफ यांनी राजीनामा द्यावा आणि पाकिस्तानात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. इम्रान यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला असला तरी इम्रान खान यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे पक्षाच्या प्रवक्त्या अनीला खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टामधील दोन अत्यंत महत्त्वाचे हवाईतळ उडवून देण्याचा प्रयत्न शुक्रवारी तालिबानी दहशतवाद्यांनी केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत १२ हल्लेखोर ठार झाले. पाकिस्तान हवाई दल वापर करीत असलेला सामुंगली हवाईतळ आणि खलिद लष्करी हवाईतळ यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले होते.