पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्यासाठी स्थापन झालेल्या तेहरिक-ए-इस्लाम या पक्षाच्या अध्यक्षपदी गुरुवारी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सार्वत्रिक निवडणुकीमुळे क्रूर आणि भ्रष्ट राजवटीतून जनतेची सुटका होईल, अशी प्रतिक्रिया इम्रान यांनी या निवडीनंतर दिली.
पक्षांतर्गत लोकशाही असावी, या हेतूने तेहरिक-ए-इस्लामच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र, इम्रान यांच्याव्यतिरिक्त कोणीही अर्ज न भरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. आमच्या पक्षाच्या घटनेनुसार कोणत्याही अध्यक्षाला दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी या पदावर राहता येणार नाही, त्यामुळे घराणेशाहीला आळा बसेल. अन्य पक्षांनीही पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची आवश्यकता आहे, असे इम्रान यांनी सांगितले. २३ मार्च या दिवशी आपल्या पक्षाचा लाहोर येथे मोठा मेळावा होणार असून त्यात आमची ताकद सर्वाना समजेल, या मेळाव्यानंतर जमात-ए-इस्लामी या पक्षाशी काही जागांबाबत आम्ही समझोता करण्याचा प्रयत्न करू, असे इम्रानने सांगितले. पाकिस्तानमध्ये ११ मे या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

Story img Loader