पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर रॅलीमध्ये एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यानंतर इम्रान खान यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी हल्लोखोराला अटक केली आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला आहे. या मोर्टात पीटीआय पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह राजधानीकडे निघाले होते. त्यातच हा मोर्चा वजिराबाद येथे आला असताना एकाने इम्रान खान यांच्या दिशेने गोळीबार केला.
हेही वाचा : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हल्लखोर इम्रान खान यांच्या दिशेने गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. त्यातच एकजणाने मागून त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. पण, हल्लोखोर पळून जाताना दिसत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी हल्लोखोराला अटक केली आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यावर लाहोर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर, अन्य १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.