पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक केली होती. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयासह पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या मुख्यालयावर हल्ला केला. अनेक ठिकाणी जाळपोळ केली.
या घटनाक्रमानंतर पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवली. न्यायालयाने इम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे. यानंतर पाकिस्तानच्या संसदेतील (नॅशनल असेंब्ली) विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीकास्र सोडलं आहे. इम्रान खान यांना भरचौकात फाशी द्यायला हवी होती, असंही राजा रियाज अहमद खान म्हणाले.
हेही वाचा- “इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, तातडीने सुटका करा”, सुप्रीम कोर्टाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना भरचौकात फाशी द्यायला हवी होती, पण न्यायालयाने त्यांचं जावयासारखं स्वागत केलं. इम्रान खान यांच्यासारख्या ज्यू एजंटवर न्यायाधीश इतके खूश असतील तर त्यांनी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफमध्ये प्रवेश घ्यायला हवा. त्या पक्षात काही जागा रिक्तही आहेत. त्यांनी (न्यायाधीशांनी) भविष्यात पीटीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवावी. तसेच विद्यमान न्यायाधीशांच्या जागी असे न्यायाधीश आणले पाहिजेत, जे गरिबांना न्याय देऊ शकतील,” असंही राजा रियाझ अहमद खान पुढे म्हणाले.
हेही वाचा- Photos: “जबरदस्तीने अपहरण केलं आणि काठीने…”, कोठडीतील अत्याचाराबाबत इम्रान खानचे गंभीर आरोप
इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानात केलेल्या तोडफोड आणि जाळपोळच्या घटनांवर भाष्य करताना राजा रियाझ म्हणाले, “इम्रान खान यांच्या समर्थकांनी केलेल्या कृत्यांमुळे संपूर्ण सभागृहाला शरमेनं मान खाली घालावी लागत आहे. संपूर्ण देशासाठी ही लज्जास्पद बाब आहे.”