सार्वत्रिक निवडणुकीसाठी  देशात ११ मे रोजी मतदान होत असून त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ गट) व इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षांत सर्वाधिक चुरस असेल, असा अंदाज ताज्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. ‘हेराल्ड’ मासिकाने निवडणुकीसाठी हे सर्वेक्षण केले असून बुधवारी हे सर्वेक्षण प्रसारमाध्यमांसाठी प्रसृत करण्यात आले.
‘हेराल्ड’ मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात २५ टक्के मतदार हे ११ मे रोजी नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे तर २४.९८ टक्केमतदारांचा कल इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफला मतदान करणाऱ्यांचा आहे. याव्यतिरिक्त १७.७४ टक्के मतदार हे गेली पाच वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला मतदान करू इच्छितात.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची संख्या ही निम्म्यापेक्षा अधिक आहे. या प्रांतात नवाझ शरीफ गटाचे वर्चस्व कायम असून त्यांना या निवडणुकीत सर्वाधिक ३८.६६ जागा मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. या प्रांतात इम्रान खान यांच्या पारडय़ात ३०.४६ टक्केतर पाकिस्तान पीपल्स पार्टीला १४.३३ टक्के  मते अपेक्षित आहेत.
सिंध प्रांत हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी पक्षाला या निवडणुकीत सर्वाधिक ३५.२१ टक्के तर त्यापाठोपाठ मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पक्षाला १९.३७ टक्के, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफला ८.४५ टक्के तर पाकिस्तान मुस्लीम लीगला (नवाझ शरीफ गट) ८.१ टक्के मते पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रांतातील ५० टक्क्य़ांहून अधिक मतदारांनी पीपीपीच्या गेल्या पाच वर्षांतील कारभारावर कठोर टीका केली आहे. या सरकारची कामगिरी खराब आणि अतिखराब असल्याचे मत या मतदारांनी व्यक्त केले आहे, मात्र तरीही सर्वेक्षणानुसार या प्रांतात पीपीपीला सर्वाधिक मते मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या सर्वेक्षणात वायव्य पाकिस्तानातील खैबर-पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफला सर्वाधिक ३५.४१ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे, तर त्यापाठोपाठ पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ गट) १२.९२ टक्के, अवामी नॅशनल पार्टी १२.४४ टक्के अशी मतांची टक्केवारी असेल.
बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगलला सर्वाधिक १९.१८ टक्केत्यापाठोपाठ पीपीपीला ८.२२ टक्के, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफला ५.४८ टक्के तर पाकिस्तान मुस्लीम लीगला (नवाझ शरीफ गट) २.७४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात ‘हेराल्ड’ मासिकातर्फे ४२ जिल्हे व दोन आदिवासी भागांत हे सर्वेक्षण करण्यात आले. १२८५ मतदारांनी या वेळी आपली मते नोंदविली. ही निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शकरीत्या घेण्यास पाकिस्तान निवडणूक आयोग असमर्थ ठरेल, असे मत ६५.६ टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे तर २९ टक्के मतदारांनी याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या बाजूने कौल नोंदवला आहे.
कुठल्याही परिस्थितीत मतदान करण्याची इच्छा ६६ टक्के मतदारांनी प्रकट केली आहे, तर कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी सरकारी धोरणांत फारसा फरक पडणार नाही, असे ४० टक्के मतदारांना वाटते.
दरम्यान, ‘हेराल्ड’ मासिकाने १० राजकीय विशेषज्ञांचे मतही ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात घेतले आहे. त्यानुसार राष्ट्रीय असेंब्लीत कोणत्याही पक्षाला साधारण बहुमत मिळणार नाही, असे या विशेषज्ञांचे मत आहे.
‘हेराल्ड’ मासिकाने मार्च आणि एप्रिल महिन्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, सामाजिक संगठना यांचा कौलही घेतला असून त्यानुसार या निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगला सर्वाधिक ३४.८९ टक्के जागा, त्यापाठोपाठ २४.८९ टक्के जागा पाकिस्तान पीपल्स पार्टीला मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष या निवडणुकीत १२.११ टक्के जागा मिळवून तिसऱ्या स्थानावर राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.