पाकिस्तानातील पंतप्रधानांविरोधात इम्रान खान यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच चिघळत चालले आहे. नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा नाही तर आपल्या हजारो समर्थकांसह आपण त्यांच्या घरात घुसायलाही मागे-पुढे पाहणार नाही, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. तर पाकिस्तानच्या लोकप्रतिनिधीगृहास घेराव घाला, असे आदेश धर्मगुरू असलेल्या ताहिरूल कादरी यांनी आंदोलकांना दिले. या पाश्र्वभूमीवर शरीफ यांनी देशहितार्थ इम्रान खान यांची भेट घेण्याचे मान्य असल्याचे जाहीर केले. तर, सरकारविरोधात उग्र निदर्शने करणाऱ्या इम्रान खान आणि कादरी यांना येथील सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे.
देशातील लोकशाही यंत्रणा बळकट व्हावी अशी आमची मनीषा आहे. त्यामुळे सध्या उद्भवलेल्या पेचप्रसंगातून तोडगा काढण्यासाठी सरकारने चार पावले पुढे यावे आणि गांभीर्याने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा पाकिस्तान तेहरिक इ इन्साफ पक्षाने व्यक्त केली. तर पाकिस्तानातील जनतेचा उद्रेक शांत व्हावा यासाठी इम्रान यांच्याशी चर्चा करण्याची तयारी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दर्शवली आहे. मात्र ही भेट नेमकी कधी होईल, याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इम्रान खान यांचे ट्विट
पंतप्रधानांचे निवासस्थान, राष्ट्रपतींचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक देशांचे दूतावास असलेल्या चौकात आम्ही स्वातंत्र्य साजरे करणार आहोत, असे इम्रान यांनी ट्विटवर म्हटले आहे.

Story img Loader