पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इम्रान यांचे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणे निश्चित आहे. या मोठया विजयाबद्दल इम्रान खान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मी १९९६ साली तहरीक-ए-इन्साफची स्थापना केली. पाकिस्तानासाठी मी २२ वर्ष संघर्ष केला. आज मला अल्लाहने संधी दिली आहे. मला माझे घोषणापत्र लागू करण्याची संधी मिळाली आहे.
मोहम्मद अली जीना यांनी पाकिस्तानसाठी जे स्वप्न पाहिले होते ते मी पूर्ण करणार असे इम्रान खान यांनी सांगितले. मी पाकिस्तानला प्रगती करताना पाहिले त्यानंतर पुन्हा खाली येतानाही पाहिले आहे. यापुढे पाकिस्तानात भ्रष्टाचाराला थारा नसेल असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानात माणुसकीचे शासन असले पाहिजे. कोणाबरोबरही राजकीय भेदभाव करणार नाही तसेच सू़डबुद्धीने वागणार नाही असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तान समोर आज अर्थव्यवस्थेचे आव्हान आहे. पाकिस्तान आज कर्जबाजारी आहे. त्यातून पाकिस्तानला बाहेर काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. पाकिस्तानात गुंतवणूक आणण्याला आपण पहिले प्राधान्य देणार आहोत. आपले सरकार व्यवसायाभिमुख आणि उद्योग सुलभ धोरणे आखेल असे आश्वासन त्यांनी दिले. आतापर्यंत पाकिस्तानात जितकी सरकारे आली त्यांनी स्वत:वर खर्च केला पण मी लोकांकडून कर रुपाने जमा होणारा पैसा लोकांसाठीच खर्च करेन. लोकांच्या कराच्या पैशाची संरक्षण करण्याची जबाबदारी माझी असेल असे इम्रान यांनी सांगितले. जो कुणी देशाच्या विरोधात जाईल त्याच्याविरोधात कारवाई करेन. मग तो श्रीमंत, गरीब कोणीही असो असे इम्रान म्हणाले. चीनने कसा विकास केला ते आपल्यासमोर उत्तम उदहारण असून तसा विकास करण्याचा आपला प्रयत्न असेल असे इम्रान यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या संसदेत २७२ जागा असून त्यापैकी १२० जागांवर इम्रान यांचा पक्ष आघाडीवर आहे. पाकिस्तानातील अन्य पक्षांनी ही निष्पक्ष निवडणूक नसल्याचा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असली तरी ते अजूनही बहुमतापासून दूर आहेत. बहुमतासाठी १३७ जागा आवश्यक आहेत. त्यामुळे इम्रान यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी अन्य छोटया पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. पक्षाच्या समर्थकांचा पाकिस्तानातील रस्त्यांवर जल्लोष सुरु आहे.