“पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ते आहेत”, असा आरोप भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) परिषदेतील बैठकीनंतर केला. याचे पडसाद आता पाकिस्तानातही उमटू लागले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बिलावल भुट्टो यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या लंडनमधील चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले आहेत. तर, बिलावल भुट्टो यांनी नुकताच भारत दौरा केला. यापार्श्वभूमीवर पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी या दोहोंवरही टीका केली आहे. ते पीटीआयच्या एका रॅलीत बोलत होते. “जगभरात पाकिस्तानची नाचक्की होत आहे. बिलावल भुट्टो तुम्ही संपूर्ण जगाचा दौरा करत आहात. पण त्याआधी सांगा की देशाचा पैसा दौऱ्यावर उडवण्याआधी कोणाला विचारता? या दौऱ्याचा फायदा किंवा तोटा काय?”, असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >> जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले; ‘बिलावल हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक’
एससीओ बैठकीत बिलावल भुट्टो, यांनी भाषणात दहशतवादाला ‘‘राजनैतिक लाभाचे शस्त्र बनवले जाऊ नये’’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून जयशंकर यांनी भुत्तो यांच्यावर तीव्र टीका केली. जयशंकर म्हणाले की, भुट्टो यांच्या, दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करण्याच्या विधानांतून त्यांची मानसिकता नकळतपणे प्रकट झाली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काय म्हणाले होते?
एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भुट्टो यांना त्यांच्या पदाप्रमाणे वागणूक दिली गेली. पाकिस्तानचा मुख्य आधार असलेल्या दहशतवाद उद्योगाचा प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ता असा त्यांचा उल्लेख आम्ही केला आणि बैठकीतच त्यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद करण्यात आला, असे जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. ‘‘दहशतवादपीडित दहशतवादाच्या प्रवक्त्यांशी चर्चा करू शकत नाही,’’ असे खडेबोलही जयशंकर यांनी भुट्टो यांना ‘एससीओ’ परिषदेत सुनावले. ‘‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील,’’ असा पुनरूच्चारही जयशंकर यांनी केला. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या परकीय गंगाजळीपेक्षाही वेगाने घसरत आहे, असा टोलाही जयशंकर यांनी पाकिस्तानला लगावला.