जमशेदजी नौरोसजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त सरकार त्यांच्या स्मरणार्थ नाणी जारी करणार आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालय येत्या ६ व ७ जानेवारीला ही नाणी जारी करणार आहे.
जमशेदजी टाटा हे भारतातील उद्योगांचे पिता मानले जातात. अशा प्रकारे भारतीय उद्योजकाचा गौरव केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमशेदजी टाटा यांची निवड सरकारने केली असून भारतीय उद्योजकांना यातून प्रेरणा मिळू शकेल. भारत सरकारने आतापर्यंत कलाकार, स्वातंत्र्यसेनानी, संस्था, वैज्ञानिक, संस्था व संघटना यांच्या नावाने आतापर्यंत नाणी काढली आहेत. यापूर्वी सरकारने जमशेदजी टाटा यांच्या नावाने १९५८ व १९६५ मध्ये टपाल तिकिटांची मालिका जारी केली होती. जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची स्थापना केली होती व तो भारतातील सर्वात मोठा समूह आहे. जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमध्ये नवसारी येथे झाला होता.
१८८०पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९०४ पर्यंत त्यांनी लोखंड व पोलाद कंपनी स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले. काही जलविद्युत प्रकल्प व जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था त्यांनी काढल्या होत्या. त्यांची सर्व स्वप्ने त्यांच्या जीवनकाळात पूर्ण झाली नाहीत पण उद्योजकतेची बीजे त्यांनी रोवली. जमशेदपूरच्या पोलाद प्रकल्पाची रूपरेषा त्यांनी तयार केली होती.

Story img Loader