पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी छत्तीसगढमधील दंतेवाडा या नक्षलग्रस्त परिसराला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील सुकमा गावानजीकच्या ५०० गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी ओलीस म्हणून धरले आहे. हे सर्व गावकरी एकत्रितपणे मोदींच्या सभेसाठी जात होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांना बंधक बनवले. या वृत्ताला स्थानिक पोलीसांकडूनही दुजोरा मिळाला असून पोलीस सध्या पुढील रणनीती आखत आहेत. नक्षवाद्यांनी यापूर्वीच नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शविला होता. या दौऱ्यासाठी तब्बल १५,०००हून अधिक पोलीस दल तैनात करण्यात आले असूनही हा प्रकार घडल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या भेटीत मोदी महत्त्वपूर्ण अशा विकास प्रकल्पांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच एखाद्या नक्षलग्रस्त भागाला भेट देत आहेत. यामध्ये रावघाट ते जगदलपूर हा रेल्वेमार्ग आणि बस्तर जिल्ह्यातील स्टील प्रकल्पाचा समावेश आहे. यावेळी ते नया रायपूर येथील पोलीस मुख्यालयाचे उद्घाटनदेखील करणार होते. मात्र, या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याने मोदींची याठिकाणची भेट रद्द झाली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांकडून असलेला धोका लक्षात घेता मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमवीर अनेक सुरक्षा दलांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याशिवाय, नरेंद्र मोदी आज तीन महत्वाच्या आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी असणाऱ्या योजना सुरु करणार आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि अटल पेंशन योजनेला सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या तीनही योजनांची घोषणा केली होती. या तीनही योजनांचं उद्घाटन देशभरात ११२ ठिकाणी एकाचवेळी होणार आहे.