उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेबाबत असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे औवेसींनी?
“ज्या समाजात मारेकऱ्यांना हिरो मानलं जातं त्या समाजात कोर्टात जाऊन न्याय कसा मिळणार? न्याय व्यवस्था कशाला हवी अशा समाजात? अतीक आणि त्याचा भाऊ अशरफ दोघंही पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना हातकडीही बांधण्यात आली होती. मात्र जय श्रीरामचे नारे देत त्यांची हत्या करण्यात आली. योगी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था नाकर्ती ठरली आहे. एनकाऊंटर झाल्यावर ज्यांना आनंद साजरा करावासा वाटतो तेच या हत्येला जबाबदार आहेत” अशा आशयाचं ट्वीट असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे.
काय घडली घटना?
पोलीस अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची मेडिकल चाचणी करण्यासाठी आणण्यात आलं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक आणि अशरफ या दोघांना मेडिकलसाठी नेण्यात येत होतं. त्यावेळी तिथे ANI, PTI या वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी अतिकशी बोलत होते. अतीक आणि अशरफ मीडियाशी बोलत असतानाच या दोघांवर पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला. या भागात अंधाधुंद गोळीबार झाला त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. गोळ्या लागल्यामुळे अतिक आणि अशरफ या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ANI ने या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही मेडिकलसाठी घेऊन जात असताना काही अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तीन जणांनी फायरिंग करत या दोघांना ठार केलं आहे. यानंतर संपूर्ण घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.