पीटीआय, न्यूयॉर्क
न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे १.१ दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांना दिवाळी सण साजरा करता येणार आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार येत्या १ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरातील शाळा बंद राहणार आहेत.

महापौर कार्यालयातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे उपायुक्त दिलीप चौहान म्हणाले की, न्यूयॉर्क शहरातील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय आमच्या शहरातील विविधतेचा आणि आमच्या समुदाय तसेच नेत्यांच्या अथक प्रयत्नांचा परिपाक आहे. दिवाळी सण एकतेचे प्रतीक असल्याचे चौहान यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. अमेरिकेतील भारतीयांसाठी या सुटीचे विशेष महत्त्व आहे. अनेक कुटुंब, मित्र आणि शेजारी यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. न्यूयॉर्कला जगातील सर्वसमावेशक शहर बनण्यास यामुळे हातभार लागणार असल्याचे ते म्हणाले.