काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा आता आसाम राज्यात पोहोचली. आसाममधील हिमंता बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी आसाममध्ये येताच केली. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशात द्वेष पसरविण्याचे काम करत असून लोकांच्या पैशांची लूट करत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी आसामच्या मरियानी शहरात यात्रा पोहोचली असता याठिकाणी भाजपा सरकारच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या महिलांनी कार्यक्रम सोडून राहुल गांधींच्या ताफ्याकडे धाव घेतली. याचा व्हिडिओ काँग्रेस नेत्यांनी शेअर केला आहे.
आसामच्या शिवसागर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले की, आसाम मधील सरकार देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार असेल. आमच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशा यात्रांमुळे काँग्रेसला कोणताही फायदा होणार नाही, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली. या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मागच्या वर्षी काढलेल्या भारत जोडो यात्रा काढल्यामुळे देशातील राजकारणाचा नूर पालटला.
भाजपा आणि आरएसएसने देशात द्वेष पसरवून समाजा-समाजात संघर्ष निर्माण केला. लोकांचा पैसा लुटणे आणि देशाचे नुकसान करणे, एवढे एकच काम त्यांना येते, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आसाममधील मरियानी या शहरात पोहोचले. तेव्हा त्याठिकाणी आसामचे मुख्यमंत्री नव्या योजनेचे अर्ज महिलांना वाटणार होते. यासाठी महिलांनी मोठी रांग लावली होती. राहुल गांधींचा ताफा पाहून सर्व महिला सर्व महिला रांग मोडून ताफाच्या दिशेने धावत आल्या. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.
जयराम रमेश म्हणाले की, मारियानी शहरात मुख्यमंत्री सर्मा यांनी आयोजित केलेल्या एका सोहळ्यासाठी या महिला येथे जमल्या होत्या. त्यांना शासकीय योजनेचे अर्ज दिले जाणार होते. मात्र राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी या महिला मोठ्या उत्साहात धावत आल्या. राहुल गांधी यांच्या ५ व्या दिवसाची यात्रा आसाममधून मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे, असेही यावेळी रमेश म्हणाले.
राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेची सुरूवात १४ जानेवारी रोजी केली. ६,७१३ किलोमीटर यात्रचा शेवट २० मार्च रोजी मुंबईत होणार असल्याचे सांगितले जाते. तर आसाममध्ये २५ जानेवारी पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. ही यात्रा १५ राज्यातून ११० जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे.