भारताने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ल्यासाठी लेझर गाईडेड स्मार्ट बॉम्बचा (स्पाइस-२०००) वापर केला. या हल्ल्यात २५० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असेल असा अंदाज स्मिहाकुट्टी वर्थमान यांनी वर्तवला आहे. निवृत्त एअर मार्शल स्मिहाकुट्टी वर्थमान विंग कमांडर अभिनंदन वर्थमानचे वडील आहेत. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते.

आयआय़टी मद्रासमध्ये डिफेंसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर भारताने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकच्या विषयावर बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. आपले जास्तीत जास्त टार्गेटस म्हणजे दहशतवादी तळावर उपस्थित असताना भारतीय हवाई दलाने हा हल्ला केला. कदाचित इमारतीचे कमी नुकसान झाले असेल पण उशिराने फुटणाऱ्या बॉम्बमुळे जास्तीत जास्त दहशतवाद्यांचा नक्कीच खात्मा झाला असेल असे स्मिहाकुट्टी वर्थमान म्हणाले.

पाकिस्तानची एफ-१६ विमाने आणि अॅमराम क्षेपणास्त्रापासून आपल्याला धोका आहे असे ते म्हणाले. हल्ल्यासाठी बालकोटमध्ये घुसताना पाकिस्तानची एफ-१६ विमाने आपल्या मागे येणार नाहीत. ती विमाने दुसऱ्या दिशेला जातील हे आपल्या सुनिश्चित करायचे होते. त्यानुसार आपण रणनिती आखून चतुराईने त्यांना चकवा दिला.

आपण जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरच्या दिशेने सात विमाने पाठवली. पाकिस्तानला वाटले आपण बहावलपूरवर हल्ला करण्यासाठी चाललो आहोत म्हणून त्यांनी त्यांची एफ-१६ विमाने त्या दिशेने पाठवली. त्याचवेळी आपण बालकोटवर हल्ल्यासाठी विमाने पाठवली. एकूणच आपल्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी हवाई दलाला आपली चालच लक्षात आली नाही असे स्मिहाकुट्टी वर्थमान यांनी सांगितले.

भारताकडून हल्ला होणार हे माहित असल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे सर्तक होता. पण आपण त्यांच्या हद्दीमध्ये आलो आहोत हे त्यांना कळालेच नाही असे स्मिहाकुट्टी वर्थमान म्हणाले. एअर स्ट्राइकच्या विषयावर हे माझे आकलन आहे. हे सगळेच बरोबर असेल असे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.