bihar bridge news : बिहारमध्ये नदी किंवा रस्त्यावर नव्हे, तर चक्क शेतात पूल बांधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेतकऱ्यांनीही या पुलाचा विरोध केला असून आमच्या शेतात पूल बांधण्याचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. यावरून आता समाजमाध्यमांवरही विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पूल नदीवर न बांधता शेतात बांधल्याने आश्चर्य व्यक्त
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या अररिया जिल्ह्यात हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अररिया जिल्ह्यातील राणीगंज प्रखंड भागातील परमानंदपूर या गावातील एका शेतात हा पूल बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथून जवळच नदी आहे. या नदीवर एक पूल प्रस्तावित होता. पण काही दिवसांपासून या नदीला पाणी नसल्याने या पुलाचं काम थांबवण्यात आलं होतं. मात्र, आता प्रशासनाने हा पूल नदीवर न बांधता शेतात बांधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हेही वाचा – विकास दिव्यकीर्तींनंतर आता खान सर यांच्या कोचिंग सेंटरवरही कारवाईचा बडगा; नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका!
पुलाला गावातील शेतकऱ्यांचा विरोध
महत्त्वाचे म्हणजे या पुलावरून गावकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पुलाला गावातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. आमच्या खासगी जागेवर हा पूल का बांधण्यात आला? असा प्रश्न येथील गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. तसेच या संपूर्ण प्रकारात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. हा पूल नदीवर किंवा रस्त्यावर न बांधता आमच्या शेतात बांधण्यात आला असून पुढे तो कोणत्याही रस्त्याला जोडलेला नाही. त्यामुळे हा पूल काहीही कामाचा नाही, असेही शेतकरांनी म्हटलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, या घटनेनंतर जिल्हाधिकारी इनायत खान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आठ दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. तसेच याप्रकरणात जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.