पीटीआय, कोरबा
छत्तीसगडमधील १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून त्या मुलीसह तिघांची हत्या केल्याप्रकरणी कोरबा जिल्ह्यातील जलदगती न्यायालयाने नुकतीच पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील सहाव्या आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली. विशेष सरकारी वकील सुनील कुमार मिश्रा यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली.
अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश ममता भोजवानी यांनी संतराम मजहवार (४९), अब्दुल जब्बार (३४), अनिलकुमार सारथी (२४), परदेशी राम (३९) आणि आनंद राम पणिका (२९) या पाच जणांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून), ३७६ (२)(ग) (सामूहिक बलात्कार) आणि अन्य कलमांअंतर्गत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. त्याशिवाय त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदी आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) खटला चालवण्यात आला होता. या पाच जणांनी २०२१मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांची हत्या केली होती. हा खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवण्यात आला. आणखी एक आरोपी उमाशंकर यादव (२६) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
हेही वाचा :Donald Trump H1B Visa: कार्यकुशल लोकांचे स्वागतच! एच१बी व्हिसावरून ट्रम्प यांची भूमिका मवाळ
आरोपींच्या अमानवी आणि क्रूर कृत्य विकृत, घृणास्पद, क्रूर आणि भेकड असल्याचे न्यायालयाने नमूद केले. आरोपींनी २९ जानेवारी २०२१ रोजी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. तिला जखमी अवस्थेतच जंगलात फेकण्यात आले, गंभीर जखमांमुळे तिथेच तिचा मृत्यू झाला.