दिल्ली येथे अलीकडेच झालेला सामूहिक बलात्कार, त्यानंतर दिल्लीसह भारताच्या अनेक भागांत झालेली तीव्र निदर्शने, त्या तरुणीचा शनिवारी झालेला मृत्यू आदी घटनांचे जगाच्या अन्य भागांसह चीनमध्येही मोठय़ा प्रमाणावर पडसाद उमटले. त्यानंतर लोकशाहीवादी गट आणि सरकारी अखत्यारीतील प्रसारमाध्यमे यांच्यात झालेल्या  ‘ऑनलाइन’ वादावादीनंतर दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि निदर्शनांच्या बातम्यांवर नियंत्रणे (सेन्सॉरशिप) घालण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
सामूहिक बलात्कार आणि त्यानंतरच्या अनेक संवेदनाक्षम घटनांचे तीव्र पडसाद संपूर्ण जगात मोठय़ा प्रमाणावर उमटले. चीनही त्यास अपवाद नव्हता. नेमका या घटनेचा राजकीय फायदा उचलून भारत हा देश अद्यापही कसा मागासलेला आहे, मानवतेस काळीमा फासणाऱ्या घटना भारतात अजूनही कशा घडत असतात, भारतातील लोकशाही कशी अयशस्वी ठरली आहे, याचे काळे चित्र रंगविण्यास चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने प्रारंभी सुरूवात केली. परंतु नेमकी हीच बाब त्यांच्यावर एखाद्या बूमरँगप्रमाणे उलटली. भारतात अशा घटना घडत असल्या तरी तेथे लोकशाही आहे, लोकांना आपली मते निर्भयपणे मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा स्पष्टपणे उल्लेख करून चीन सरकारनेच भारतापासून चार गोष्टी शिकाव्यात, अशा कानपिचक्या सुधारणावादी, लोकशाही गटाने ब्लॉगवरून दिल्या. या पाश्र्वभूमीवर चीन सरकार चांगलेच अडचणीत आले.
भारतातील या घटनेसंदर्भात चीनमधील असंख्य ब्लॉगवर गेल्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणावर चर्चा झडल्या. हजारो, लक्षावधी लोक यामध्ये सहभागी झाले. अखेरीस सावध झालेल्या अधिकाऱ्यांनी रविवारी या चर्चेवर नियंत्रणे आणण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी तर या एकूण चर्चेवर चिनी अधिकाऱ्यांनी पूर्ण सेन्सॉरशिप जारी केली.
नॅशनलिस्टीक पार्टीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राचे संपादक ह्य़ू झिजीन यांनी भारतातील या घटनेवर टिकाटिप्पणी केली असून अशा प्रकारच्या घटना लोकशाहीतील राज्य करण्याच्या मर्यादाच अधोरेखित करतात, असे म्हटले आहे. मागासलेल्या समाजात कोणताही कायदा तुम्हास सहाय्य करू शकत नाही. भारत स्वत:स जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीवादी राष्ट्रांपैकी एक समजतो. तेथेही मोठय़ा प्रमाणावर अंदाधुंदी असल्याची टीका झिजीन यांनी केली आहे. तर भारतातील लोकशाही असमान, अपुरी आणि अकार्यक्षम असल्याची री अन्य एका लेखकाने ओढली आहे.
कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्रानेही भारतातील लोकशाही व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले आहे.
सरकारी अखत्यारीतील माध्यमांनी अशा प्रकारे भारतावर केलेल्या शेरेबाजीवर एकाने ब्लॉगवर उलट प्रतिक्रिया नोंदविली आहे. भारतात अशा प्रकारच्या निदर्शनांना अनुमती तरी दिली जाते. चीनमध्ये अशी घटना घडली तर अशी निदर्शने करण्याची परवानगी आम्हाला मिळेल काय, या धारदार शब्दांत त्याने विचारणा केली आहे.
गुआन्झोऊ येथील फेंग झेतांग या ब्लॉगधारकानेही चीनच्या हेनानमधील एका घटनेचा उल्लेख केला. तेथील अधिकाऱ्यांनी शाळकरी मुलींवर बलात्कार केला होता. त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. चिनी अधिकारी विद्यार्थिनींचा छळ करतात परंतु सरकार या मुलांची काळजी घेत नाही, अशी टीका झेतांग यांनी केली.
चीनच्या ‘चायना सेंट्रल टेलिव्हिजन’वरून भारतातील या घटनेची अतिरंजित वर्णने रंगविली जात आहेत परंतु आपल्या देशातील मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांकडे कृपया डोळेझाक करू नका, असा सल्ला ब्रुस वँग या अन्य एका ब्लॉगधारकाने दिला आहे.
दरम्यान, या सर्व विरोधी मतांची झळ सहन न होऊन चिनी अधिकाऱ्यांनी अखेरीस या सर्व बातम्यांवर सेन्सॉरशिप लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader