चीनची राजधानी बिजिंगमधील एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला झाला असून यामध्ये २० मुले जखमी झाली आहेत. बिजिंगच्या शिचेंग जिल्ह्यामधील ही शाळा आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. पण त्यांची प्रकृती स्थिर आहे असे शिचेंग जिल्हा प्रशासनाने सांगितले.

रुग्णालयाबाहेर सहा पोलीस व्हॅन उभ्या असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. शिचेंग प्रशासनाने या हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. या हल्ल्यात विद्यार्थ्यांच्या डोक्याकडच्या भागाला जखमा झाल्या आहेत असे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

चीनमध्ये हिंसक गुन्हे दुर्मिळ आहेत. पण मागच्या काही वर्षात चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जानेवारी २०१७ मध्ये दक्षिण चीनमध्ये एका माणसाने मनासारखे आयुष्यात घडत नसल्याबद्दल नैराश्यातून भाजी कापण्याच्या चाकूने १२ मुलांवर हल्ला केला होता.

Story img Loader