चीनमध्ये श्रीमंतांचे प्रमाण वाढल्यापासून अनेक चिनी महिलांमध्ये अंगरक्षक होण्याचा कल वाढला आहे. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या व्यवसायामध्ये मिळणाऱ्या घसघशीत मोबदल्यामुळे अनेक चिनी तरुणी याची निवड करत आहेत, अशी माहिती तिआनजीओ आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे प्रमुख चेन योन्गाकिंग यांनी दिली.
आमच्या संस्थेची स्थापना २००८ मध्ये झाल्यानंतर दरवर्षी शेकडो तरुणींचे प्रवेशासाठी अर्ज येतात. प्रत्येक प्रशिक्षण शिबिरामध्ये महिलांचे प्रमाण हे १० टक्क्यांच्या आसपास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घसघशीत पगार व नोकरीची सुरक्षितता या कारणांमुळे चिनी महिला अंगरक्षक होण्याचे प्रमाण वाढल्याचे ‘चायना कॅपिटल गार्ड सिक्युरटी सव्‍‌र्हिसेस’ चे प्रमुख शेन क्यूनिजीओन यांनी सांगितले.  
चीनमध्ये गेल्या काही वर्षांत श्रीमंत व्यक्तींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एक अब्ज अमेरिकी डॉलर्स उत्पन्न असलेल्या २५० व्यक्ती देशात असल्याची माहिती मागील वर्षी समोर आली होती, तर १२ लाख चिनी नागरिकांचे उत्पन्न हे दहा लाखांपेक्षा अधिक आहे.  
अंगरक्षकाचे प्रशिक्षण ही आव्हानात्मक बाब आहे. मात्र हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार मी केला आहे. आता पुरुषांप्रमाणे मीही सर्व आव्हानात्मक कार्य करू शकते, असा आत्मविश्वास या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या एका युवतीने व्यक्त केला. शारीरिक कौशल्य, सांघिक भावना आणि योग्य निर्णयक्षमता हे घटक कुशल अंगरक्षक होण्यासाठी आवश्यक असतात. बऱ्याचदा प्रतिष्ठित व्यक्तींच्या पत्नी व मुलांनाही संरक्षणाची गरज भासते, या कामांसाठी महिला अंगरक्षक या कामांसाठी उपयुक्त ठरतात, असे या प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शक मार्कोस बोर्गस यांनी सांगितले.

Story img Loader