पीटीआय, ढाका
बांगलादेशातील हिंदू समुदायाचे नेते एक राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत आहेत. हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी राजकीय प्रतिनिधित्वाचे आवाहनही केले जात आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिाश्चन युनिटी कौन्सिल (बीएचबीसीओपी) आणि इतर गटांच्या हिंदू नेत्यांनी या राजकीय पक्षाचा प्रस्ताव मांडला असून; पक्ष किंवा संसदीय जागांची मागणी करण्याच्या शक्यतेवरही हे नेते चर्चा करीत आहेत.
बांगलादेशातील हिंदू समूदायाकडून सध्या तीन मतांवर तपशीलवार चर्चा केली जात आहे. प्रथम १९५४ पासून स्वतंत्र मतदार प्रणालीकडे पुन्हा आणणे; दुसरे हिंदूंसाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणे; तिसरे अल्पसंख्याकांसाठी संसदेत राखीव जागा ठेवणे, असे ‘बीएचबीसीओपी’चे अध्यक्षीय सदस्य काजल देबनाथ यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आले.
हेही वाचा >>>Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक रोखेसंदर्भात गुन्हा दाखल!
राजकीय पक्ष स्थापनेबाबत चर्चा आणि मतांची देवाणघेवाण आमच्या प्राधान्यक्रमात आहे. अद्याप काहीही अंतिम झाले नसले तरी चर्चेतून काय निर्णय होतो, हे आगामी काळात समोर येईल, असे हिंदू समाजाचे नेते रंजन कर्माकर म्हणाले. प्रस्तावित राजकीय पक्ष बदलांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. येथील अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.