पीटीआय, नवी दिल्ली
गुंतवणूक, सरकारी खर्चवाढ, खाणकाम, बांधकाम आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढीच्या बळावर देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ७.३ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने (एनएसओ) शुक्रवारी वर्तवला.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७.२ टक्के होता, त्याहून सरस असा हा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज आहे. विशेषत: सेवा क्षेत्राची भरभराट, खाणकाम आणि उत्खनन त्याचबरोबर निर्मिती क्षेत्रातील काही विभागांच्या जोमदार कामगिरीच्या आधारावर हे उत्साहवर्धक अनुमान काढण्यात आले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात ‘एनएसओ’ने आर्थिक वर्ष २०२३-२४ चा पहिला सुधारित अंदाज शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार, निर्मिती क्षेत्रातून चालू आर्थिक वर्षात उत्पादन ६.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२-२३ मध्ये या घटकाच्या वाढीचे प्रमाण अवघे १.३ टक्के होते. त्याचप्रमाणे, चालू आर्थिक वर्षात खाण क्षेत्राची वाढ २०२२-२३ मधील ४.१ टक्क्यांवरून जवळपास दुप्पट म्हणजे ८.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांमध्ये वाढीचा दर या आर्थिक वर्षात ८.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो आधीच्या आर्थिक वर्षात ७.१ टक्के होता. हे सर्व घटक सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच ‘जीडीपी’वाढीचा टक्का सात टक्क्यांपुढे नेणारे ठरतील, असे एनएसओने म्हटले आहे.
वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात २०११-१२ च्या आधारभूत किमतीनुसार १७१.९ लाख कोटी रुपयांवर जाईल. ३१ मे २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या १६०.०६ लाख कोटी रुपये या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत हे वाढीव अनुमान आहे.
‘एनएसओ’च्या निवेदनानुसार, चालू आर्थिक वर्षात वास्तविक ‘जीडीपी’वाढीचा दर ७.३ टक्के राहील. मागील आर्थिक वर्षात तो ७.२ टक्के होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादनाची पातळी २९६.५८ लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. मागील आर्थिक वर्षात नाममात्र जीडीपीचा अंदाज २७२.४१ लाख कोटी रुपये होता. नाममात्र जीडीपी चालू आर्थिक वर्षात ८.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. मागील आर्थिक वर्षात वाढीचा हा दर १६.१ टक्के होता, असे विभागाने नमूद केले आहे.
व्यापार, हॉटेल्स, कृषीची मंदगती…
चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ अवघी १.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. मागील आर्थिक वर्षात नोंदवलेल्या चार टक्के विस्तारापेक्षा ती घसरण्याचा अंदाज आहे. तसेच व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण या सेवांची वाढही २०२२-२३ मधील १४ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ६.३ टक्केच राहील, असा ‘एनएसओ’चा अंदाज आहे.
‘एनएसओ’चे भाकीत…
चालू आर्थिक वर्षात खाण क्षेत्राच्या वाढीचा दर गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दुप्पट म्हणजे ८.१ टक्के.
वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांतील वाढीचा दर ८.९ टक्के.
हे सर्व घटक सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच ‘जीडीपी’वाढीचा टक्का सात टक्क्यांपुढे नेणारे ठरतील