पीटीआय, नवी दिल्ली
दाट धुक्यामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी दृश्यमानता शुक्रवारी सकाळी शून्यावर आली. त्यामुळे शंभरहून अधिक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. दिल्लीत शुक्रवारी सकाळी दाट धुके होते. तसेच, दिवसभर ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दिल्लीत किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. खराब हवामानामुळे दिल्ली विमानळावर १००हून अधिक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. मात्र, दिल्लीकडे येणारे कुठलेही विमान दुसरीकडे वळविण्यात आले नाही. दाट धुक्यामुळे श्रीनगर विमानतळावरही उड्डाणांना फटका बसला. दुपारनंतर विमानसेवा सुरळीत झाली. पंजाब, हरियाणामध्येही अनेक ठिकाणी शुक्रवारी सकाळी दाट धुके होते.
दरम्यान, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएल) ने अद्यायावत उड्डाण माहितीसाठी प्रवाशांना संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचे आवाहन केले तसेच प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुके होते आणि दृश्यमानता शून्य मीटरवर नोंदवली गेली. सर्व धावपट्ट्या निश्चित मानकांनुसार कार्यरत असून ज्यामुळे कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही विमाने उड्डाण करू शकतात, असेही स्पष्ट केले.
हेही वाचा : चीनच्या कुरापतींवर भारताचे आक्षेप
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे १३०० उड्डाणे होतात.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता पालम हवामान केंद्राने गेल्या दोन तासांत शून्य मीटर दृश्यमानतेसह खूप दाट धुके नोंदवले, तर प्राथमिक हवामान केंद्र सफदरजंगने ५० मीटर दृश्यमानता नोंदवली. शनिवारीही दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून कमाल तापमान १७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : आप नव्हे आपदा, पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र
हवेची गुणवत्ताही खराब
शुक्रवारी सकाळी ९ वाजता दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३६१ नोंदवण्यात आला, जो ‘अत्यंत खराब’ श्रेणीत येतो. एक्यूआय शून्य आणि ५० च्या दरम्यान ‘चांगले’, ५१ आणि १०० ‘समाधानकारक’, १०१ आणि २०० ‘मध्यम’, २०१ आणि ३०० ‘खराब’, ३०१ आणि ४०० ‘अतिशय खराब’ आणि ५०० च्या दरम्यान ‘गंभीर’ मानले जाते.