दिल्लीत कार चालकाने दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. यात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पुढे आल्यानंतर अनेकांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमोद सिंह आणि शैलेश चौहान अशी या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी दोघेही बेर सराय मार्केट येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका कारला हात दाखवत थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारचालकाने गाडी थांबवली. मात्र, दोघेही कारजवळ जाताच त्याने दोघांना धडक दिली. त्यामुळे दोघेही बोनेटवर पडले. त्यानंतर कार चालकाने जवळपास २० मीटरपर्यंत दोघांना फरफटत नेलं. यात दोघेही जखमी झाले.
यासंदर्भात बोलताना दिल्ली पोलिसांनी सांगितलं की आम्हाला पीसीआरवर रात्री ८ च्या सुमारास एक फोन आला होता. त्यावेळी दोन वाहतूक पोलिसांना कारने धडक दिल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी दाखल झालो. त्यावेळी दोन्ही कर्मचारी जखमी अवस्थेत होते. आम्ही त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार ही गाडी वसंतकुंज येथे राहणाऱ्या जय भगवान नावाच्या व्यक्तीची असल्याचे पुढे आलं आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.