यंदाची जी-७ शिखर परिषद इटलीत आयोजित करण्यात आली असून या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी अपुलिया येथे दाखल झाले. यादरम्यान, त्यांनी आज दुपारी (शुक्रवार, १४ जून ) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – G7 परिषदेसाठी इटलीत आलेल्या नेत्यांचं पंतप्रधान मेलोनींकडून भारतीय पद्धतीने स्वागत; VIDEO पाहून लोकांकडून कौतुक

महत्त्वाचे म्हणजे रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेस्की यांना भेटले. त्यामुळे या भेटीची चांगलीच चर्चा रंगल्याचं बघायला मिळालं. याआधी २०२३ मध्ये जपानमध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी भेट झाली होती. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी युद्धाबाबत भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणताही संघर्ष हा संवादातूनच सोडवला जाऊ शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली. ऋषी सुनक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान संरक्षण, आण्विक, अंतराळ आणि डिजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात सहाकार्य वाढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रायलाकडून सांगण्यात आले.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मागील एका वर्षातली ही आमची चौथी भेट आहे. यादरम्यान आम्ही संरक्षण, तंत्रज्ञान, सुरक्षा, तसेच संशोधन क्षेत्राला कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल, या विषयांवर चर्चा केली, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनासाठी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना शुभेच्छाही दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In g7 summit pm narendra modi bilateral meeting with emmanuel macron rishi sunak volodymyr zelenskyy spb