बायडेन प्रशासनाला ‘एफडीए’ समितीचा धक्का!
सरसकट सर्वांना वर्धक मात्रा देण्याची गरज नसल्याची शिफारस अमेरिकेच्या आरोग्यविषयक समितीने केली आहे. व्हाइट हाऊसने वर्धक मात्रा सर्वांना देण्याचा प्रस्ताव मांडला होता, तो अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) समितीने फेटाळला आहे.
फायझर लशीची वर्धक मात्रा पासष्ट व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच ज्यांच्यात करोनाची तीव्रता जास्त आहे त्यांना देण्यात यावी, असे समितीने म्हटले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या समितीने केलेल्या या शिफारशीमुळे बायडेन प्रशासनाला धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वी बायडेन प्रशासनाने असे म्हटले होते, की सरसकट सर्वांना फायझरची लस वर्धक मात्रेत द्यावी, म्हणजेच तिसऱ्यांदा ही लस द्यावी असा त्याचा अर्थ होता.
अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाच्या समितीत बाहेरील तज्ज्ञांचाही समावेश आहे. या समितीने १६ विरुद्ध २ मतांनी वर्धक मात्रा सरसकट सर्वांना देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. वर्धक मात्रेबाबत सुरक्षा व परिणामकारकता माहिती उपलब्ध नाही. वर्धक मात्रा सरसकट सर्वांना न देता ती विशिष्ट वयोगटातील व्यक्ती व गंभीर आजारी व्यक्ती यांना देण्यात यावी, असे समितीने म्हटले आहे. विशिष्ट गटातील व्यक्तींना लशीची वर्धक मात्रा देण्याचा प्रस्ताव १८ विरूद्ध शुन्य मतांनी मंजूर करण्यात आला. ज्यांना विषाणूचा जास्त धोका आहे व प्रकृती खूप खालावली आहे असे लोक, तसेच पासष्ट वर्षे वयावरील व्यक्तींना वर्धक मात्रा देण्यात यावी, अशी शिफारस समितीने मतैक्याने केली.
या निर्णयाने व्हाइट हाऊसला धक्का बसला आहे. प्रशासनाने महिनाभरापूर्वी असे म्हटले होते, की फायझर व मॉडर्ना या लशीच्या वर्धक मात्रा दुसऱ्या मात्रेनंतर आठ महिन्यांनी देण्यात याव्यात. शुक्रवारचे मतदान हा या प्रक्रियेतील पहिला टप्पा असून अन्न व औषध प्रशासन पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय घेईल. पण असे असले तरी अंतिम शिफारस ही समितीचीच असेल.