गोवा विधानसभेत यंदा डिजिटल बजेट मांडण्यात येणार आहे. पारंपारिक पद्धतीने अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. गोव्यामध्ये यंदाचे बजेट डिजिटल स्वरुपात असेल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. टॅबच्या माध्यमातून बजेट मांडण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पाच्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांना टॅबचे वाटप करण्यात येणार असून त्यावर सदस्यांना अर्थसंकल्पातील तरतुदी पाहता येतील. आपल्या देशात अर्थमंत्री समोर ठेवलेल्या कागदपत्रांचे वाचन करुन अर्थसंकल्प सादर करतो. गोव्यामध्ये ही पद्धत बदलण्यात आली आहे.
मुख्यमंत्री टॅबद्वारे अर्थसंकल्प मांडणार आहेत. मोदी सरकार डिजिटलायझेनशनासाठी प्रचंड आग्रही आहे. पर्रिकर सरकार डिजिटल बजेट मांडून त्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. सभापतींनी आमदारांना हे टॅब वाटण्यास सांगितले आहे. या टॅबमध्ये गोव्यात नुकत्यात उद्घाटन झालेल्या अटल सेतू ब्रिजच्या फोटोंचे एक फोल्डर आहे. अशा प्रकारे डिजिटल बजेट मांडणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असू शकते. गोवा विधानसभेच्या तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज अर्थसंकल्प सादर करतील.