भाजप, अब्दुल्लांना बळ; काँग्रेसला झळ

हरियाणामध्ये मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज चुकविताना सलग तिसऱ्यांदा भाजपने सत्ता कायम राखली आहे.

jammu Kashmir,
भाजप, अब्दुल्लांना बळ; काँग्रेसला झळ

पीटीआय, चंडीगड / श्रीनगर
हरियाणामध्ये मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज चुकविताना सलग तिसऱ्यांदा भाजपने सत्ता कायम राखली आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षांनी पुन्हा एकदा ‘अब्दुल्ला’ सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या दोन्ही राज्यांमध्ये प्रभाव पाडण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरला.

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा आणि अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष होते. जूनमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच निवडणूक होती. हरियाणात लोकसभेला काँग्रेसने भाजपला रोखले होते, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये अपक्ष इंजिनीअर रशीद यांचा विजय लक्षवेधी ठरला होता. मात्र विधानसभेला गणिते पूर्ण बदलली. रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाला विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडता आला नाही. हरियाणात भाजपने निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करत, विजय खेचून आणल्याचे मानले जाते. जाट समाजाविरोधात इतर मागासवर्गीय मते घेण्याची रणनीती यशस्वी ठरली. निवडणुकीपूर्वी काही महिने भाजपने मनोहरलाल खट्टर यांना बदलून नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. ती चाल यशस्वी ठरल्याचे निकालातून दिसते. सैनी हे लाडवा मतदारसंघातून १६ हजार मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे भूपिंदर हुडा यांनी रोहटक जिल्ह्यातील गृही सापला-किलोई ही जागा मोठ्या मताधिक्याने राखली. कैटीहल मतदारसंघातून (पान ८ वर) (पान १ वरून) काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते रणदीप सिंह सुरजेवाला यांचे पुत्र आदित्य विजयी झाले. त्यांनी भाजपचे आमदार लीला राम यांचा पराभव केला. भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल विज चुरशीच्या लढतीत अंबाला कँट मतदारसंघातून विजयी झाले.

हेही वाचा : Haryana Assembly Election 2024 : हरियाणात भाजपाला पूर्ण बहुमत; पण कृषी आणि अर्थमंत्र्यांसह ‘या’ आठ मंत्र्यांचा पराभव

ओमर पुन्हा मुख्यमंत्रीपदी

जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स तसेच काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवले. फुटीरतावादी इंजिनीअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष तसेच जमाते इस्लामीला फारसे यश मिळाले नाही.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्री होतील असे फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केले. ओमर हे दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले. भाजपची जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी झाली. जम्मूतील ४३ पैकी २९ जागा भाजपने जिंकल्या. काश्मीरमध्ये यश मिळाले नाही. काश्मीर खोऱ्यात ४७ जागा आहेत.

काँग्रेसकडून निकालावर सवाल

हरियाणातील निकाल जाहीर होताच काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हरियाणात जनादेश डावलला गेल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. हा लोकशाही प्रक्रियेचा पराभव असल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्यक्ष जे दिसत होते त्यापेक्षा हा निकाल वेगळा आहे असे रमेश यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यांना केवळ तीन जागा जिंकता आल्या.

विकासाचे राजकारण तसेच सुशासनाचे हे यश आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ असून जनतेचा आभारी आहे. जम्मू आणि काश्मीरमधील भाजपची कामगिरी अभिमानास्पद झाली. हरियाणातील शेतकऱ्यांनी काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले. जागतिकस्तरावर देशाची अर्थव्यवस्था, लोकशाही तसेच समाज कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हेही वाचा: Eknath Shinde : “हरियाणाप्रमाणेच आता महाराष्ट्रातील जनताही काँग्रेसच्या…”; भाजपाच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

एनसी ४२

काँग्रेस ६

भाजप २९

अपक्ष ७

अन्य ६

हरियाणात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

भाजप ४८

काँग्रेस ३७

आयएनडीएल २

अपक्ष ३

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In haryana bjp and in jammu kashmir national conference gets majority css

First published on: 09-10-2024 at 05:52 IST
Show comments