कुठल्या मुलींना मासिक पाळी चालू आहे हे शोधण्यासाठी त्यांची कपडे काढून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या डॉ. हरी सिंह गौर सेंट्रल युनव्हर्सिटीच्या वसतिगृहात घडला आहे. मुलींची अशा प्रकारे तपासणी करणाऱ्या महिला केअरटेकरला निलंबित करण्यात आले आहे. वॉर्डनने मुलींचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश दिले होते. न्यू राणी लक्ष्मीबाई गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरुम बाहेर वापरलेले सॅनिटरी नॅपकिन सापडल्यानंतर मुलीची तपासणी करण्यात आली.
शुक्रवारी ४० विद्यार्थीनींची अशा प्रकारे तपासणी करण्यात आली. मुलींनी विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरकडे रविवारी या बद्दल तक्रार केली. वॉर्डन चंदा बेन यांनी केअरटेकर इंदूला मुलींची तपासणी करण्याचे आदेश दिले असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर व्हाईस चान्लसरने स्वत: मुलीच्या हॉस्टेलला भेट दिली व वॉर्डन आणि केअर टेकर दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मी रविवारी माझ्या घरी होतो. त्यावेळी ३५ मुली मला भेटायला आल्या व त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लिखित तक्रार दिली. जे काही घडले त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतेय. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी मी समिती स्थापन केली आहे असे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर प्राध्यापक आरपी तिवारी यांनी सांगितले. तात्काळ कारवाई केली नाही, तर मोर्चा काढू विद्यापीठातील वर्ग बंद पाडू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.