तरुणांमध्ये सध्या इंस्टाग्रामवरील रीलचं मोठं आकर्षण निर्माण झालं आहे. रील बनवण्याच्या नादात तरुण तरुणी स्वत:चा जीव धोक्यात घालायलादेखील मागे पुढे बघत नाहीत. काही दिवसांपूर्वी रील काढताना दरीत कोसळून अन्वी कामदार या तरुणीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता रील काढण्याच्या नादात आणखी एका तरुणानं आपला जीव गमावल्याचे पुढं आलं आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हैदाबादमध्ये बाईकवर स्टंट करताना एका रीलस्टारचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य एक तरूण जखमी झाला आहे. हैदराबादच्या रचाकोंड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेद्दा अंमरपेठ जवळील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. हे दोघेही इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी बाईकवर स्टंट करत होते.मात्र, चालकाचे बाईवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला.
या अपघातानंतर स्थानिकांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी एका तरुणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर अन्य एका तरुणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती. रील काढण्याच्या नादात दरीत कोसळून अन्वी कामदार या तरुणीचा मृत्यू झाला होता. अन्वी कामदार आणि तीचे सहा सहकारी वर्षा पर्यटनासाठी माणगावमधील कुंभे येथे आले होते. एका कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि ती ३०० फूट दरीत कोसळली होती.
हेही वाचा – Viral Video: रील बनविण्याच्या नादात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गळफास घेण्याचा खेळ जीवावर बेतला
याशिवाय मध्यप्रदेशमध्ये रील बनवण्याच्या नादात एका ११ वर्षांच्या मुलाचादेखील जीव गेल्याची धक्कादायक घडली. मध्य प्रदेशच्या मुरैनातील अंबाह गावातील लहान मुले खेळता खेळता रील बनवत होते. रील बनविण्यासाठी एका ११ वर्षांच्या मुलाने गळफास घेण्याचा अभिनय केला, मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट येऊन त्याचा काही सेकंदात मृत्यू झाला.