केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी चीनचं कौतुक केलं आहे. चीन हा देश शांततेचा पुरस्कर्ता आहे. आपल्या भाषणात विविध उदाहरणं देत त्यांनी ही गोष्ट सांगितली. चीनची रणनिती काय आहे यावर त्यांनी भाष्य केलं. तसंच त्याद्वारे चीनने कसा विकास केला हेदेखील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर भारतात लोकशाही संकटात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा एक विचार संपूर्ण देशावर थोपवू पाहात आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधी चीनबाबत नेमकं काय म्हणाले आहेत?
चीनमध्ये आपल्याला ज्या प्रकारच्या पायाभूत सोयी आणि सुविधा दिसतात त्या उत्तम आहेत. रेल्वे, एअरपोर्ट हे सगळं चीनने निसर्गाशी जोडलं आहे. चीन निसर्गासह उत्तम प्रकारे जोडला गेला आहे. अमेरिकेबाबत विचार केला तर अमेरिकेला वाटतं की आपण निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहोत. मात्र चीन हा शांतता प्रिय देश आहे. चीनचं सरकार उत्तम प्रकारे काम करतं आहे. एखाद्या कॉरपोरेशनप्रमाणे ते सरकार त्यांची कामं पूर्ण करतं. त्यामुळेच प्रत्येक माहितीवर सरकारची पूर्ण पकड असते. चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतही खूप पुढे गेला आहे असंही राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातल्या भाषणात म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरबाबत काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?
राहुल गांधी यांनी आपल्या संबोधनात पुलवामा हल्ल्याचाही उल्लेख केला. एवढंच नाही तर जम्मू काश्मीर ही तथाकथित हिंसक जागा आहे असंही म्हटलं आहे. राहुल गांधी म्हणाले मी त्या जागी गेलो होते जिथे ४० जवान शहीद झाले होते. एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी पेगासस बाबतही राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आहे.
भारतात लोकशाही संकटात आहे
राहुल गांधी म्हणाले की भारतात लोकशाही संकटात आहे. पेगासस प्रकरणात माझाही फोन रडारवर होता. मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की फोनवर बोलत असताना सावधगिरी बाळगा कारण तुमचा फोन टॅप होतो आहे. भारतात एक प्रकारे दबावाचं वातावरण आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केसेस टाकल्या जात आहे. माझ्या विरोधातही काही केसेस आहेत. आम्ही आमचा बचाव करत आहोत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. भारताचे विद्यमान पंतप्रधान हे भारताचे मूळ विचार नष्ट करत आहेत. आपला एकच विचार ते भारतावर थोपवू पाहात आहेत असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरही टीका केली.