दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे इराकच्या अस्तित्वासमोरच आव्हान निर्माण झाले आहे. इराकमध्ये सरकार स्थापन करण्यात वेळ दवडू नका आणि घुसखोरांवर प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज व्हा, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनी इराकचे नवनिर्वाचित पंतप्रधान नुरी अल् मलिकी यांना फटकारले. अमेरिका या प्रश्नावर इराकला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही केरी यांनी दिले. दरम्यान, आयएसआयएलच्या दहशतवाद्यांनी आणखी काही शहरे ताब्यात घेतली आहेत. तर हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये २१ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.
इराकमध्ये सुन्नी अतिरेक्यांची आगेकूच सुरू असून त्यांनी पश्चिम इराकमध्ये आघाडी घेतली आहे. त्या वेळी धुमश्चक्रीत २१ जण ठार झाले. अनेक शहरांतून सुरक्षा दलांनी माघार घेतली. तल आफर हे उत्तर इराकमधील महत्वाचे शहर व तेथील विमानतळ अतिरेक्यांनी ताब्यात घेतला आहे. जिहादी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट या संघटनेच्या वतीने या लढय़ाचे नेतृत्व केले जात असून त्यात रावा, अ‍ॅना व  पश्चिम वाळवंटातील अनबार भाग ताब्यात घेतला.
तेथे अडकलेल्या ३९ भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असून एका भारतीयाच्या मृत्यूच्या बातमीची खातरजमा केली जात असल्याचे भारताने म्हटले आहे. तर कोलकाता येथील दोघे सोमवारी भारतात परतले.

Story img Loader