पीटीआय, श्रीनगर, जम्मू
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्रभर सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री उशिरा बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टण भागामधील चक तापेर क्रीरी भागात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. रात्रभर घेराबंदी सुरू राहिली आणि सकाळी तीन दहशतवादी मारले गेले असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत दहशतवाद्यांची आणि त्यांच्या संघटनेची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे, जम्मू विभागाच्या राजौरीमध्ये नियंत्रणरेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला असे सुरक्षा दलांनी सांगितले. राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये कलाल भागामध्ये शनिवारी ही चकमक झाली. नियंत्रणरेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना हे दहशतवादी आढळून आल्यावर सुरक्षा दलांनी कारवाई केली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आठवड्याभरात नौशेरा सेक्टरमधील अशा प्रकारे घुसखोरीच्या प्रयत्नाची ही दुसरी घटना उघड झाली आहे. यापूर्वी लाम भागामध्ये ९ सप्टेंबरला दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले होते.

हेही वाचा : “जम्मू व काश्मीरचे घराणेशाहीमुळे नुकसान!”, पंतप्रधान मोदी यांची नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, पीडीपीवर टीका

दहशतवादविरोधी मोहीम

अलिकडील घुसखोरी आणि दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर किश्तवार, उधमपूर, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी मोहीम तीव्र केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. याअंतर्गत मोठ्या भागाची घेराबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jammu and kashmir 3 terrorists killed in baramulla encounter css