संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. २१ डिसेंबर रोजी पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे ४ जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री आज राजौरीत दाखल झाले. दहशतवादी हल्ल्यानंतर २२ डिसेंबर रोजी भारतीय सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवली होती. त्यावेळी ३ नागरिकांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिघांचाही मृ्त्यू झाला. तिन्ही मृतांच्या नातेवाईकांची आज राजनाथ सिंह भेट घेणार आहेत. भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमधील दहशतवाद मुळापासून नष्ट करणार, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : राम मंदिर की बेरोजगारी? देशासमोरची महत्त्वाची समस्या कोणती? सॅम पित्रोदांचा सवाल
संरक्षण मंत्री सिंह यांनी भारतीय सुरक्षा दलांना यावेळी मार्गदर्शन केले. “दहशतवाद जम्मू काश्मीरमधून संपवला पाहिजे. तसा निश्चय करुन आपल्याला पुढे जावे लागेल. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय लष्कर जम्मू काश्मीरमधून दहशतवाद संपवण्यात विजयी होईल”, असे राजनाथ सिंह म्हणाले. २१ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात चार जवान शहीद तर दोन जखमी झाले होते. जखमी झालेल्या जवानांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी राजनाथ सिंह यांनी प्रार्थना केली आहे. भारतीय सैन्य दलाचा प्रत्येक जवान आपल्यासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले. मृत्यू झालेल्या ३ नागरिकांच्या कुटुंबियांची भेट काल भारतीय सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा घेतली होती. त्यानंतर २४ तासांच्या आतच राजनाथ सिंह मृतांच्या कुटुंबातील सदस्यांना भेट देणार आहेत.