जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा दहशतवाही हल्ला झाला आहे. नुकताच शौर्यचक्र पुरस्कार मिळालेल्या परशोत्तम कुमार यांच्या घराजवळील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील गुंडा खवास या गावातील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर हा हल्ला करण्यात आला आहे. भारतीय लष्कारे काही दिवसांपूर्वीच इथे सुरक्षा पोस्ट स्थापन केली होती. तसेच या ठिकाणी काही जवान तैनात करण्यात आले होते. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास या पोस्ट दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळात लष्कराचा एक जवान जखमी झाला.

हेही वाचा – दहशतवादाचा केंद्रबिंदू जम्मूकडे सरकतोय का? या भागात सातत्याने हल्ले का होत आहेत?

दरम्यान, शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते का? असं विचारलं असता, याबाबत अद्याप सांगता येणार नाही. मात्र, त्यांच्या घरावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती लष्काराला मिळाली होती. त्यानुसार लष्काराने त्यांच्या घराजवळ सुरक्षा पोस्ट स्थापन केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

परशोत्तम कुमार यांना काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कालाकोट परिसरातील हल्ल्यादरम्यान परशोत्तम कुमार स्वत:चा जीव धोक्यात घालत भारतीय लष्कराची मदत केली होती.

हेही वाचा – Mehbooba Mufti : “देशाच्या रक्षणासाठी जवान काश्मीरमध्ये येतात अन् शवपेटीतून परत जातात”, मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारवर संताप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले होते. त्यापूर्वी कठुआ जिल्ह्यातील सैदा या गावातही अशीच एक घटना घडली होती. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला होता.

काही दिवसांपूर्वी बसवर झाला होता हल्ला

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात ९ जून रोजी यात्रेकरूंना घेऊन जाणारी ५३ आसनी बस दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दरीत कोसळली होती. या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात तीन महिलांसह नऊ जण ठार झाले होते. तर ३३ जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील काही भागात सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत.